दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहिम राबविणार – दीपक केसरकर
अन्यथा एक इमारत पाडून त्या ठिकाणी “मल्टीस्पेशालिटी” उभारणार…
सावंतवाडी
दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेले हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एकदा हत्ती पकड मोहिम राबविण्याचा निर्णय वनमंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. लवकरच याची अमंलबजावणी केली जाईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सावंतवाडीत होणार्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे. निधी आहे परंतू जागेअभावी हा प्रश्न रखडला आहे. परंतू तोडगा न निघाल्यास दोनापैकी एक इमातर तोडून त्याठिकाणी नवी इमारत उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.
श्री. केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, दोडामार्ग तालुक्यात हत्तीच्या नुकसानी पासून कंटाळलेल्या लोकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यासमवेत चर्चा झाली. यावेळी हत्ती हटाव मोहिम पुन्हा राबविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षकांना दिल्या आहेत. मात्र पकडलेले हत्ती कर्नाटकात सोडावेत की हत्तीग्राम उभारावा याबाबत अद्याप पर्यत निर्णय झालेला नाही.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी उभारणीसाठी आमचा प्रयत्न आहे. शहरातील अन्य जागेचा विचार होता परंतू वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णांला जाणे शक्य होणार नाही हा विचार लक्षात घेता त्याच जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राजघराण्याशी चर्चा सुरू आहे. तोडगा न निघाल्यास दोनापैकी एक इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभी केली जाणार आहे. मात्र चर्चेअंती जागेचा प्रश्न सुटेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.