You are currently viewing आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कणकवली ते आचरा मार्गावरून जाणारी वाहतूक त्रासदायक ठरण्याची शक्यता

आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कणकवली ते आचरा मार्गावरून जाणारी वाहतूक त्रासदायक ठरण्याची शक्यता

पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मालवण :

दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी यात्रा यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालेले असताना मात्र कणकवली ते आचरा मार्गावरून जाणारी वाहतूक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कणकवली ते आचरा या मार्गावरील कणकवली भागातील आचरा रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक या यात्रेला येत असताना हे काम यात्रेपूर्वीच पूर्ण होण्याची आवश्यकता होती. मात्र सद्यस्थितीत यात्रेपूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असून चालू असलेल्या कामाच्या गतीचा अंदाज विचारात घेता यावर्षी आंगणेवाडीला येणाऱ्या भाविकांना या धुळीच्या व खोदून ठेवलेल्या रस्त्यातूनच मार्ग काढत जावे लागणार आहे.

मालवण तालुक्यातील पिसकामते, वरवडे या भागातील काम हे धीम्या गतीने सुरू असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याचा आंगणेवाडी यात्रेकरूंना होणारा त्रास दूर कसा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून याबाबत संबंधित ठेकेदाराला काम तातडीने व गतीने मार्गी लावण्याबाबत सूचना दिली जाण्याची अपेक्षा आहे. अन्यथा धीम्या गतीने सुरू असलेले काम पूर्ण झाले नाही तर येथे मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी व वाहनांची वर्दळ यामुळे अपघात देखील होण्याची भीती आहे. सद्यस्थितीत कणकवली भागातील या रस्त्याचे कार्पेट करण्याचे काम सुरू असून कार्पेट पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उलटून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर हे काम मार्गी लागण्यासाठी प्रशासन पातळीवरून प्रयत्न होतील असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा