You are currently viewing ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन

ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन

ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन

‘हेल्पलाईन सेवा’ ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त

-पालकमंत्री नितेश राणे

  • पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवावा
  • ज्येष्ठ नागरिक आणि भावी पिढी सुरक्षित असावी
  • ‘ग्रामसंवाद’उपक्रम कौतुकास्पद

सिंधुदुर्ग 

शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा समाजासमोरील महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ‘हेल्पलाईन सेवा’ अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

            जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या  ‘ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार परशुराम गंगावणे, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे,  पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका श्रीमती वृंदा कांबळी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. ज्येष्ठांसाठी शासनाने अनेक कायदे तर केलेच शिवाय त्यांना विविध योजनांचा लाभ देऊन स्वावलंबी देखील बनविले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. आज सुरू केलेली हेल्पलाईन सेवा ज्येष्ठांसाठी वरदान ठरणार आहे.  ज्येष्ठांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांना तात्काळ मदत मिळेल. त्यामुळे सर्वांनी 7036606060 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवावा. संकटाच्या काळात आपण पोलिसांना फोन लावला तर आपल्याला निश्चितपणे मदत मिळणार हा विश्वास सिंधुदुर्ग पोलिसांवर आहे. हा विश्वास अशा उपक्रमांमुळे अधिक घट्ट होणार आहे.  पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे पोलिस आणि सामान्य जनता यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण होते असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपल्या जिल्ह्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे भावी पिढीचे भविष्य अंधकारमय बनत असल्याने हा प्रश्न सोडविणे समाजासमोर आव्हान बनला आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवणे हीच आपली गुंतवणूक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘अंमली पदार्थ मुक्त’ जिल्हा बनवायचे आहे. यामध्ये पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्य विश्वासाने पर्यटक आपल्या जिल्ह्यात येतात.  पर्यटकांना त्रास होईल असे कृत्य जिल्ह्यात होता कामा नये. काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी. या मेळाव्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक, आर्थिक गुंतवणूकीबाबत, विविध शासकीय योजना, सुरक्षितताविषयक माहिती देखील देण्यात येत असल्याने हा मेळावा कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

            आमदार दिपक केसरकर म्हणाले, शासन अनेक शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असते. अशा योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा. ‘वयोश्री योजने’अंतर्गत ज्येष्ठांना ३ हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येत आहे. अशा अनेक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.

            श्री विशेष पोलिस महानिरीक्षक श्री दराडे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक तसेच सामान्य माणसांसाठी पोलिस विभाग २४ तास उपलब्ध आहे. तुम्ही संकटाच्याकाळी पोलिसांची मदत घेऊन समस्या सोडवू शकता. आम्ही पोलिस स्टेशन स्तरावर अनेक सुविधा कक्षाची  स्थापना केलेली असून या कक्षाच्या माध्यमातून जनतेला लाभ देत आहोत.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत पोलिस अधीक्षक श्री अग्रवाल यांनी या मेळाव्यामागील संकल्पना सांगितली ते म्हणाले,  जेष्ठ नागरिकांना वेळोवेळी आरोग्‍य, सुरक्षा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी मदत मिळत नाही. कौटुंबीक संपत्तीच्या वादामुळेही जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात एक जेष्ठ नागरिक सेल कार्यरत आहे. जेष्ठ नागरिकांच्या समस्या सुटाव्यात त्यांना पोलीसांची व अन्य शासकीय विभागाची मदत मिळावी, त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे या व्यापक हेतूने शाश्वत उपाययोजना म्हणून 24 तास कार्यरत असणारी व्हाटस्ॲप व हेल्पलाईन क्रमांकांचे आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलीस आणि जेष्ठ नागरिक एकसंघ होऊन उद्भवलेल्या समस्यांचे वेळेत निराकारण करण्याचा आमचा मानस आहे. या हेल्पलाईनशी संपर्क केल्यानंतर जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने व गतीमान पद्धतीने प्रतिसाद देण्यात येणार.  पोलीस विभागाशी संबधित समस्या कायदेशिर मार्गाने सोडविण्यासोबत इतर प्रशासकीय विभागाशी निगडित काही समस्या असल्यास त्या विभागाशी समन्वय ठेवून समस्याचे निराकारण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिक कक्षामार्फत चालणारे कामकाज

जिल्ह्यातील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलीत करून त्यांच्याशी समन्वय ठेवणे, त्यांच्या भेटी घेणे.  हेल्पलाईन नंबरवर किंवा अर्जाद्वारे किंवा वैयक्तीकरित्या सेलकडे संपर्क साधून मदत मागितल्यास त्यांना तात्काळ मदत पुरवणे,  ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७ च्या तरतुदीनुसार ज्येष्ठ नागरिक यांना आवश्यक ती कायदेशिर मदत मिळवण्याकरीता सहाय्य करणे,  ज्येष्ठ नागरिक यांच्या बैठकी व मेळावे आयोजित करणे.

 ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेसाठी सुचना –

 ज्येष्ठ नागरिक यांच्याबाबत घडणाऱ्या गुन्ह्यात बहुतांश वेळा ओळखीच्या व्यक्तींचा समावेश असतो. उदा नोकर, नातेवाईक, विक्रेते इ., कामावर ठेवण्यात येणाऱ्या घरगुती मदतनिस किंवा नोकर यांचा पुर्वइतिहास तपासून बघा. त्यांची पोलीसांमार्फत चारित्र्य पडताळणी करून घ्या. तुमच्या नोकरांना वारंवार भेटायला येणाऱ्या व्यक्तीचा पुर्वइतिहास तपासून घ्या. तुमचे मौल्यवान सामान कोणत्याही बँकेच्या सेफ कस्टडी मध्ये ठेवा. मौल्यवान दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी जावू नका.  तुमचे ओळखपत्र कायम सोबत बाळगा. तुम्ही एकटे असल्याबाबत तुमचे पोलीस पाटील, हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष यांना माहिती द्या. डोअर अलार्म, इलेक्ट्रॉनिक आय बेल सारख्या अधुनिक उपकरणांचा वापर करा.  घराच्या प्रवेशद्वाराला सुरक्षा दरवाजा किंवा पीपहोल करून घ्या. अपरिचीत व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय घरामध्ये प्रवेश देवू नका. दुरूस्ती करीता आलेले कामगार किंवा विक्रेते यांना ओळख पटल्याशिवाय घरामध्ये प्रवेश देवू नका. आपत्कालीन औषधे तसेच फॅमिली डॉक्टरांचा संपर्क क्र तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे क्रमांक सहज सापडतील अशा जागी ठेवावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा