गोपुरी येथे रंगस्पर्श कार्यशाळा संपन्न
कणकवली :
नुकतीच गोपुरी आश्रमच्या कै. गणपतराव सावंत बहुउद्देशीय प्रशिक्षण संकुलात गोपुरी जीवन मूल्य शिक्षण शाळे मार्फत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगाच्या माध्यमातून लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास असा प्रयोग “रंगस्पर्श” या नावे करण्यात आला. चित्रकार नरेंद्र राणे यांनी खास मेहनत घेऊन आणि जीवन मूल्य शिक्षण शाळेच्या उद्देशांशी सांगड घालत छोट्या मुलांना रंगाच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या भावना कागदावर उमटवून त्यातून आपल्या कल्पना शक्तीला चालना देत नवनवीन आकार शोधणे आणि स्वयं चित्र तयार करणे शिकवले.
रंग हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे रंगा बरोबर खेळत लहान मुले सुद्धा आपल्या भावना, विचार व्यक्त करतात. व्यक्त होण्याबरोबरच ताण कमी करणे, मनाची शांती मिळवणे तसेच मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य याद्वारे व्यक्तिमत्व विकास होतो. यासाठी लहान मुलांना रंगाबरोबर मोकळे पण खेळता यावे यासाठी विशेष असे कष्ट घ्यावे लागले. जीवन शिक्षण या गोपुरीच्या उपक्रमाद्वारे मुलांचे भावविश्व अनुभवता आले आणि त्यातूनही आपल्याला बरेच काही शिकता आले. आपण यापुढेही जीवन शिक्षण शाळेची संलग्न राहू असे चित्रकार नरेंद्र राणे यांनी समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान सांगितले. चित्रकार राणे यांनी बी.एस.बांदेकर कॉलेज सावंतवाडी मधून BFA (Bachelor of Fine Art) डिग्री पुर्ण केली. आता TAGBAG या दिल्ली मधील कंपनीमध्ये Creative Lead. या पदावर काम करत आहेत. त्यांच्या ब्लॉगवर कोकणातील जुन्या अनोख्या गोष्टी जतन केल्या जात आहेत. जीवन शिक्षण शाळेचे संदीप सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले
यावेळी गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर ,सचिव विनायक मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर,जीवन मूल्यशिक्षण शाळेचे संयोजक विनायक सापळे तसेच पालक उपस्थित होते.