“माझ्यासाठी हिच खरी आळंदी”….
सह्याद्रीच्या पायथ्याशी माणगाव, मोरे येथे सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी तीन चाकाच्या खुर्चीवर बसून एका घनदाट अरण्यात, जेथे जाण्यासाठी धड रस्ता नव्हता. पावसाळ्यात पूर आल्यावर सगळे मार्ग बंद अशा ठिकाणी तब्बल बारा एकर जागेत दिव्यांगासाठी काम करणाऱ्या एका वेड्या दिव्यांग असलेल्या आमच्या वेड्या भगिनीने मोठ्या जिद्दीने आणि दिव्यांगाच्या पंखात सामर्थ्य निर्माण करण्यासाठी पाय ठेवला.ज्यांच विशेष कौतुक भारतरत्न अटलजी,भारतरत्न कलामसाहेब, तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी, तत्कालीन पंतप्रधान स्व. मनमोहनसिंग,हिंदूह्यदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, चिञपट अभिनेते अमीर खान, सलमान खान,सोनिया गांधी ,स्व.मनोहर जोशी अशा एक नव्हे असंख्य महानुभावांनी ज्याना गौरविले त्या गौरव मूर्ती,अर्थात आमच्या लाडक्या डॉ.नसिमादिदि,ज्यानी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने बघता बघता या प्रकल्पाचे सोने केले. सुरुवातीला अनेक छोटे मोठे उद्योग सुरू होते ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि आपल्या सिंधुदुर्गातील दिव्यांग बंधू- भगिनी यात मनाने गुंतले गेले त्यांची संख्या अडीचशेच्या वर होती.
या प्रकल्पात सगळ्यात लक्षवेधी प्रकल्प म्हणजे काजू प्रक्रिया युनीट, जे व्यवस्थित सुरू होते त्यामुळे दीडशेहून जास्त दिव्यांग आपली रोजी रोटी स्वतः कमवत असतं, मात्र मध्यंतरी कोरोनामुळे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली. पुन्हा मदतीसाठी शोधाशोध, सुदैवाने बजाजने आपल्या सि. एस्. आर. मधून मदतीचा हात दिला आणि पुन्हा मोठ्या जोमाने काजू प्रक्रिया युनीट सुरू झाले. ज्या दीडशेहून जास्त आमच्या दिव्यांगाच्या पोटापाण्याची जटिल समस्या होती ती मार्गी लागली… त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य तरळू लागले.
मी तसा या साहस परिवाराशी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जोडला गेलो. पाच वर्षापूर्वी नसिमादिदिनी अगदी टोकाचा आग्रह केल्याने साहसचा विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. नेहमी जाणे शक्य नसते पण काही बॅकेचे व्यवहार व इतर महत्त्वाच्या विषयासाठी जाणे होते. काही विषयावर दिदिशी किंवा गेली अनेक वर्षे दिदिंची सावली बनून काम करणारे सताराम पाटील यांच्याशी चर्चा होते. कधी काही डेलीगेशन प्रकल्पाला भेट द्यायला येतात तेव्हा जातो… पण ही भेट म्हणजे माझ्यासाठी प्रती आळंदी आहे. जेव्हा मी तेथे जातो तेव्हा आपल्या कामात मग्न असलेले आमचे दिव्यांग बांधव अगदी प्रेमाने आदरपूर्वक सर.. सर.. म्हणून हाक मारतात आणि त्या प्रत्येकाच्या पाठीवरून जेव्हा मी हात फिरवतो त्या भावना एक वेगळचं समाधान देऊन जातात. ९० टक्के दिव्यांग असलेल्या आमच्या आदरणीय नसिमादिदिचे हे कार्य शब्दबद्ध करणे फार कठीण काम आहे… पण माझ्यासाठी ही आळंदी आहे.
… नकुल पार्सेकर…
विश्वस्त, साहस, कोल्हापूर.
