झाराप पर्यटक मारहाण प्रकरणात पोलिसांनीच दाखल केली तक्रार – अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले
पर्यटक जिल्ह्यात याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून उचलली कडक पावले..
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि पर्यटक प्रेमी जिल्हा आहे. त्यामुळे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेवून संशयित आरोपींविरोधात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणताही प्रकार पर्यटकासोबत घडल्यास तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांना कळवावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक बैठक सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून पोलीस अधीक्षक रावले यांनी माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अपर पोलीस अधीक्षक रावले यांनी, झाराप येथील मुंबई गोवा महामार्गावर पुणे येथून आलेले पर्यटक तेथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांना चहाच्या कपात माशी पडलेली मिळाली. त्यामुळे त्यांनी चहा बदलून द्या, अन्यथा पैसे देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यातून पर्यटक आणि हॉटेल मालक आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या रागातून हॉटेल मालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यातील रुपेश बबन सकपाळ (वय ३३) रा. कात्रज पुणे याला काठीने, हाताने डोळ्यावर, ओठावर मारून दोरीने बांधून ठेवले. यानंतर अन्य पर्यटक घाबरून पळून गेले. त्यांनी ११२ या पोलिसांच्या डायल नंबरवर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. यानंतर कुडाळ पोलीस काही मिनिटात तेथे पोहोचत मारहाण करून बांधून ठेवलेल्या पर्यटकाला सोडविले होते.
मात्र, याबाबत मारहाण झालेले पर्यटकांनी तक्रार देण्यास नकार दिला. आमची कोणतीही तक्रार नाही, असे पोलिसांना सांगितले. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना मनमोकळे, आनंददायी व कोणत्याही दहशती विना पर्यटन करता यावे याकरिता त्यांची सुरक्षा पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांवर अशाप्रकारे हल्ला करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे. पर्यटकांवर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. अशा हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच अशी मनोवृत्ती असलेल्या अन्य कोणाकडून याची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी पोलिसांनी ही कडक पावले उचलली आहेत. डायल ११२ नंबरवर मदतीचा फोन आल्यावर कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार ममता जाधव, योगेश मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पुढील प्रकार रोखला होता. तसेच सरकारी पक्षाच्यावतीने पोलीस कॉन्स्टेबल योगेश मुंढे यांनी स्वतः तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात हॉटेल मालक तन्वीर करामत शेख (वय २९), हॉटेलमध्ये काम करणारे शराफत अब्बास शेख (वय ५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय १८), श्रीम. परवीन शराफत शेख वय (४२), श्रीम. शाजमीन शराफत शेख वय (१९), तलाह करामत शेख (वय २६) सर्व राहणार झाराप खान मोहल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शराफत शेख यांना तत्काळ अटक करण्यात आली असून उर्वरित पाच जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर, अंमलदार ममता जाधव, प्रीतम कदम, योगेश मुंडे यांनी केलेली आहे, असे अपर पोलीस अधीक्षक रावले यांनी सांगितले.