You are currently viewing दादा भुसे जसे दिसले तसे 

दादा भुसे जसे दिसले तसे 

दादा भुसे जसे दिसले तसे 

 

सध्याच्या विद्यमान शासनातील शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे यांच्या मित्र परिवारातील माझे मालेगावचे मित्र व तरुणाई या वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री विशाल पाटील यांचा मला फोन आला. फोनचा आशय असा होता की श्री संत गाडगेबाबा यांनी जे वाहन प्रचारासाठी प्रसारासाठी वापरले त्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत दर्शन व्हावे लोकांना ते वाहन दिसावे अशा आशयाचा तो फोन होता. श्री विशाल पाटील यांनी लगेच मा.मंत्री महोदयांना कॉन्फरन्स वर घेतले व माझ्याशी बोलणे करून दिले. मी मंत्री महोदयांना श्री संत गाडगेबाबा यांचे चालक श्री भाऊरावजी काळे हे सध्या मुंबईलाच राहतात. श्री संत गाडगे बाबाची तत्कालीन गाडी चालण्याच्या स्थितीत नाही असे सांगितले. श्री संत गाडगेबाबा यांचे चालक मुंबईला राहतात हे ऐकून मंत्री महोदयांना आनंद झाला आणि त्यांनी मला व श्री संत गाडगेबाबा यांचे चालक श्री भाऊराव काळे यांना मुंबईला बोलावलं. त्याप्रमाणे मी श्री भाऊराव काळे यांना घेऊन माननीय नामदार श्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. माननीय श्री भुसे साहेबांनी आमच्या दोघांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. श्री संत गाडगेबाबा यांच्या चालकांची प्रगती ठणठणीत असल्याचे पाहून त्यांना खूपच चांगले वाटले. श्री दादा भुसे मला म्हणाले चला आपण मातोश्रीवर जाऊया. यांची व श्री उद्धव ठाकरे यांची भेट करून देतो. आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसलो. श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचंड गर्दी होती. परंतु श्री दादा भुसे यांना डायरेक्ट श्री उद्धव ठाकरे यांच्या केबिन मध्ये प्रवेश मिळाला. श्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना गाडगे महाराजांचे चालक श्री भाऊराव काळे व माझी ओळख करून दिली. आमचे सत्कार त्या ठिकाणी करण्यात आले. श्री गाडगे महाराजांची गाडी संपूर्ण महाराष्ट्रात फिरवायची आहे. असा सुतोवाच त्या ठिकाणी झाला. आम्ही परत श्री दादा भुसे यांच्या मंत्रालयासमोरील बगल्यावर आलो. श्री भाऊराव काळे व मी यांनी श्री गाडगे महाराजांची गाडी सध्या जवळपास फिरू शकते पण बाहेरगावी फिरू शकणार नाही त्याची स्पष्ट कल्पना दिली. पण श्री दादा भुसे यांच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल. ते म्हणाले त्याची काळजी नका करू. त्यांनी मुंबईवरून खुले कंटेनर पाठवितो. त्याप्रमाणे त्यांनी केले. त्या खुल्या कंटेनरवर श्री संत गाडगेबाबा यांची गाडी चढवून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरविले. श्री दादा भुसे यांचे मानावे तेवढे आभारच आहेत. त्यांना ती कल्पकता सुचली ती खरोखरच शब्दातीत आहे.

मागे नामदार श्री दादा भुसे अमरावतीला आले. मी त्यांना श्री संत गाडगेबाबा त्यांच्या अमरावतीच्या गाडगेनगर येथील मंदिराला भेट देण्याची विनंती केली. त्यांच्या दौऱ्यात हा कार्यक्रम नव्हता. पण त्यांनी श्री संत गाडगेबाबा यांचे नाव घेताच लवकरच मान्यता दिली. माननीय मंत्र्यांचा ताफा श्री संत गाडगेबाबा मंदिराकडे वळला. चांगला अर्धा तास त्यांनी मंदिरामध्ये घालवला. मंदिराच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि काहीही अडचण आली तरी श्री संत गाडगेबाबा यांच्यासाठी माझे दार तेव्हाही ठोठवा. मी श्री संत गाडगे महाराजांची सेवा केल्याचे मला समाधान मिळेल असे त्यांनी मला सांगितले. श्री संत गाडगेबाबा यांच्यावर प्रेम करणाऱ्या व श्री संत गाडगेबाबा यांची गाडी संपूर्ण महाराष्ट्रात कंटेनर वर फिरवणारे हे आगळे वेगळे मंत्री आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य करतील अशी अपेक्षा आहे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा