You are currently viewing धाडसी कार्याबद्दल मालवणच्या सुकन्या सौ. प्रियांका भोगावकर – पाटील यांचा रेल्वे पोलीस विभागाकडून सन्मान…!

धाडसी कार्याबद्दल मालवणच्या सुकन्या सौ. प्रियांका भोगावकर – पाटील यांचा रेल्वे पोलीस विभागाकडून सन्मान…!

धाडसी कार्याबद्दल मालवणच्या सुकन्या सौ. प्रियांका भोगावकर – पाटील यांचा रेल्वे पोलीस विभागाकडून सन्मान…!

मालवण
धावत्या रेल्वेतून ६ महिन्याच्या मुलासह फलाटावर उडी मारणाऱ्या महिलेला वाचविणाऱ्या मालवण कुंभारमाठच्या सुकन्या आणि दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शिपाई सौ. प्रियांका अविनाश पाटील (पूर्वाश्रमीच्या प्रियांका विनोद भोगावकर) यांचा मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सौ. प्रियांका पाटील या दि.१७ मार्च २०२४ रोजी दादर रेल्वे स्टेशनवर पोलीस कर्तव्य बजावत असताना फलाट क्रमांक १० वर फास्ट लोकल रेल्वेमध्ये एक महिला तिच्या मुलांना घेऊन रेल्वेत चढत असताना रेल्वे चालू झाली आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा खाली फलाटावर राहिल्याने त्या महिलेने आपल्या ६ महिन्याच्या मुलासह धावत रेल्वेतून फलाटावर उडी मारल्याने ती खाली पडली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सौ. प्रियांका पाटील यांनी त्याठिकाणी धाव घेत त्या महिलेला रेल्वेच्या खाली जाण्यापासून वाचविले. सौ. प्रियांका पाटील यांच्या या धाडसी व शूर कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रेल्वे पोलीस विभागामार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला. लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांची स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्र रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या हस्ते प्रदान करून सौ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. सौ. प्रियांका पाटील यांच्या या धाडसी कार्याचे व त्यासाठी झालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा