*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याच्या ताम्रपटावर*
धूळ झटकता पटलावरची
लख्खच सारे दिसू लागले
जरी दडवले होते काही
सारेच कसे पुन्हा उजळले॥१॥
वाटेवरचे क्षण काटेरी
तसेच काही आनंदाचे
पुन्हा एकदा त्यात हरवले
सुटले धागे सुखदुःखाचे॥२॥
मुठीत वाळू हळू सांडली
प्रीत अव्यक्त मनात दडली
काळजातली हुरहुर सारी
आवेगाने कशी दाटली ॥३॥
निष्ठा साऱ्या मी बाळगल्या
देणी घेणी चुकती केली
बाकी सारे शून्य जाहले
आता कसली भीती नुरली॥४॥
आयुष्याच्या ताम्रपटावर
एक ओळ ती होती धूसर
शब्द प्रितीचे कोवळ्यातले
तिथे राहिले कसे आजवर
*राधिका भांडारकर पुणे*