*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*मंतरलेल्या क्षणांची एक अविस्मरणीय भेट…*
*(“कवी प्रा.अशोक बागवे, व्यंगकवी अशोक नायगावकर, वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे” या त्रिमूर्तींची सोबत एक पर्वणी..!)*
“कशाचाच कशाशी काही संबंध नाही..” ही हास्यलंकारांनी खुललेली कविता सादर करताना मिशीच्या आड दडलेल्या ओठांच्या पाकळ्या हळुवार(हळू केलेला वार) मुरडत कवी अशोक नायगावकर म्हणाले…
“प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात हे माहिती नव्हतं म्हणून गुरुजींना विचारलं तर ते म्हणाले..,
“प्रेयसी गेल्यावर दुसरी मिळेपर्यंत सुतक पाळावंच लागतं…”
मग डॉक्टरकडे गेलो… त्यांनी खिशालाच स्टेटस्कोप लावला… “काय होतंय विचारलं..”
तर, “सारखं सारखं भाजपात जावसं वाटतंय..”
असं म्हणताच अचानक कुकरची शिट्टी वाजावी तसे दर्दी रसिक श्रोतेगण खळखळून पोट धरून हसू लागले. असे व्यंगावर बोट ठेऊन बिन पैशात आपल्या मधुर शब्दातून हास्याचे फवारे उडविणारे व्यंगकवी अशोक नायगावकर म्हणजे लाल, पिवळ्या गुलाब पुष्पांनी सजलेला जणू मोहक पुष्पगुच्छच…!
“कवीला नरडं नसतं त्याला गळा असतो.. कवी “सा” लावत नाही तो “आ” लावतो…
असं सांगत
*”माझा मराठीचा बोल..*
*वाजे काळजात खोल..*
*ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल..”*
असे मराठी भाषेचे गोडवे गाणाऱ्या, कौतुक करणाऱ्या, श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या बहारदार गीताने काव्य मैफिलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले ते…
*कशी म्हणावी जीवन गाणी..*
*डोळ्यांमधले खारट पाणी..*
*गालांवरती ओघळणाऱ्या..*
*मंद मंद हासूचे…*
*चार दिवस सासूचे… चार दिवस सासूचे…*
या तब्बल बारा वर्षे चाललेल्या “चार दिवस सासूचे” मराठी सिरीयलच्या अतिशय सुरेख अशा शीर्षक गीताचे गीतकार कवी प्रा.अशोक बागवे यांनी..!
कवी प्रा.अशोक बागवे म्हणजे पहाटेच्या धुक्यात दवबिंदुंचे तुषार पांघरून हासत खिदळत उमललेल्या मोगऱ्याच्या गंधावर कुणीही भाळून जावे अन् आपलेसे करावे असा जणू मोगऱ्याचा सुगंध…!
हाती हात घेताच आपलासा वाटणारा एक दिलखुलास कवी, कोकणच्या लाल मातीतला जणू चमकता हिरा..
*”मी तुझ्या खांदावर हात ठेवला तर तुला त्रास तर होणार नाही ना..!”*
असा आम्रतरूवर फुललेल्या मोहोराच्या गंधात गंधाळणारा अन् शिशिर ऋतू मधील गारव्यातही मनाला ऊब देणारा उबदार प्रश्न विचारून क्षणार्धात हृदयात शिरणारा रांगडा कवी..म्हणजे प्रा.अशोक बागवे..!
*”आमदार निवासात काही डोळे जागत होते…*
*पिंडाला कावळा शिवण्यासाठी लाल दिवा मागत होते..”*
४० वर्षांपूर्वीची आमदार निवासातील आठवण सांगताना माजी आमदार असलेल्या वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे यांनी शब्दांची कोटी केली अन् आपल्या वात्रटिका म्हणजे काय याचे साक्षात दर्शन दिले. शांत संयमी आवाजात अन् मुखातून सहज वदणाऱ्या शब्दांमधून आजच्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना पूर्वी मंत्रीपदाची अपेक्षा असायची आता पालकमंत्री पदासाठी धडपडतात..काही जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत.. ही परिस्थिती म्हणजे…
*”धड नांदता येईना, डोरलं बांधता येईना..*
*मोतराचे असल्याने पोराला पालक सांगता येईना”..*
कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री..? हे लोकांना सांगता येत नाही यावर त्यांनी अशी खोचक मिश्किल टिपण्णी केली.
पूर्वी सचिवांच्या गाड्यांना ही लाल दिवा असायचा, त्यामुळे परिसरात लाल प्रकाश पसरायचा.. त्यावेळी केलेली वात्रटिका सांगताना ते म्हणाले…
*”वेश्यांच्या परिषदेत एक नवा प्रस्ताव आला…*
*मंत्र्यांच्या गाडीमुळे लाल दिवा बदनाम झाला..*
*इथून पुढे आपण हिरवा दिवा लावुया…*
*रेड लाईट एरिया मधून ग्रीन झोन मध्ये जाऊया..”*
या पंक्तीवर चिखलात कमळ फुलावे तशी सर्वांची मुखकमले फुलली…अन् हास्य झंकार दणाणला..
पूर्वी महाभारतात डोक्यावर सोन्याचे मुकुट होते…मग छत्रपतींचे जिरेटोप आले, पेशव्यांच्या पगड्या, राजांचे फेटे, गांधींच्या टोप्या आल्या आणि आता “बाबाचे जॅकेट”…
अशा वात्रटिकांनी काहीसे गंभीर झालेल्या रसिकांना काळ्याकभिन्न खडकातून खळखळत वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याप्रमाणे खळखळून हसवले..
डोक्यावर आणि गळ्यात काय ठेवायचं हे सामान बदलले पण सत्ता राज्यात काहीही बदल झाला नाही..असे सांगत आज जिथे महाराष्ट्रात प्रत्येकाला वाटतं की..,
“गौतम अदानींसारखा पैसा अन् गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा…तिथे कोकणात साहित्यिक कार्यक्रम होतो ही मराठी भाषेची खरी सेवा होय..! ”
“आमचे हल्लीचे कवी एवढे नाजूक असतात की, चांदण्यात सुद्धा टोपी घालून बसतात.. आमच्या कवितेत बायको सुद्धा येत नाही, प्रेयसी तर दूरच..!
माझा प्रेयसीचा अन् चंद्राचा काहीही संबंध नाही.. मी सूर्याचा माणूस आहे.. दिवस ढकलण्याचे काम करतो.. अंधार पडण्यापूर्वी साडेचारच्या आत घरात..” असं म्हणताच रसिक श्रोत्यांच्या गर्दीत एकच हशा पिकला..
पुरुष हा हळुवार मनाचा असतो अन् स्त्री ही निर्दयी…!
मेथीची जुडी साफ करताना पुरुष मेथीच्या जुडीच्या सुतळीची गाठ अलगद सोडवितो पण..,
स्त्री मात्र दोन बोटे घालून सुतळी तोडून टाकते..किती हो निर्दयी..!
पुरुष मेथीच्या रोपाचे एक एक पान खुंटतो अन् स्त्री झटक्यात पाने अन् देठ वेगवेगळी करते..
बाजारात दुधी भोपळा घेताना पुरुष हळुवार हात फिरवून गोंजारतो अन् स्त्री देठाजवळ निर्दयीपणे कचकन नख खुपसते..
वांग चुलीवर भाजताना स्त्री उलटे सुलटे करून खरपूस भाजते… पण, पुरुष ते जास्त भाजलं तर नाही ना म्हणून गोंजारण्यात स्वतःचा तळवा सुद्धा भाजून घेतो..
संत्र्या मोसंबीच्या साली काढून त्यांना विवस्त्र केलं जातंय अन्… भर बाजारात पोलिसांच्या समोरच कलिंगडाच्या पोटात चाकू खुपसला जातो अशा मार्मिक टिपण्णी करून समाजातील व्यंगावर बोट ठेवत व्यंगकवी अशोक नायगावकर यांनी समस्त लहान थोर स्त्री पुरुष वर्गाला जाग्यावरच खिळवून ठेवले अन् गालावर गोड हास्य विलासित करीत मिशीच्या आडून मुखातून अलगद वदणाऱ्या आपल्या नाजूक, हळुवार शब्दरसाने रसिकांची मुखकलिका खुलवित शब्द फुलांनी त्यांची ओंजळ भरुन टाकली..
*”जरा अंगी येता जातीचीच कळ..भुजांतले बळ दर्शविती..*
*ढासळला आता सारा गावगाढा.. वेशीतच राडा दिग्गजांचा..!”*
या काव्यातून फुटाणेंनी जात, धर्म व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करत…
जीव जन्मा घातले, ते उतले मातले त्यात माझे काय चुकले..?
मानव जन्माला घातले यात माझं काय चुकलं..?
असा प्रश्न ईश्वराला पडला असेल.. अशी परिस्थिती आज पहायला मिळते आहे.. असे सांगून “माझं काय चुकलं..?” ही कविता सादर करून “देश कीर्तनाने सुधारला नाही अन् तमाशाने बिघडला नाही..” असा समाजाच्या जांघेवर चिमटा काढला.
कवी जेव्हा प्राणातून बोलतो तेव्हा त्याला नसतं हसायचं..
सगळं समजून उमजून भोळ व्हायचं असतं..”
कविता ही अंतर्मुख करणारी असते असे सांगून आपल्या बहारदार आवाजात जेव्हा भैरवी गायली तेव्हा कवी प्रा.अशोक बागवे यांची उंची कळली…
*नदीच्या किनारी नदीला म्हणावे…*
*तुझे पूर माझ्या नसांतून यावे…*
*अभंगात गोडी तुझ्या भाकरीची*
*तहानेत माझ्या तुला ओळखावे…*
अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी गेली कित्येक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कवी प्रा.अशोक बागवे, कवी अशोक नायगावकर, कवी रामदास फुटाणे या त्रिमुर्तींची संगत तब्बल वीस तास लाभावी, एकाच टेबलवर बसून जेवणाचा, चहापानाचा आस्वाद घ्यावा.. मध्यरात्र उलटून गेल्यावरही शशीधराच्या नाजूक चांदण प्रकाशात चांदण्यांनी जागत बसावे आणि गप्पांचे फड रंगून यावे, नानाविध अनुभवाचे बोल कानांना तृप्त करावे, अन् कधी काळी ज्यांना दूरदर्शनवर पाहिले, शब्दांमधून ऐकले त्यांच्या संगतीने एकाच व्यासपीठावर विराजमान होऊन त्यांच्या काव्याचा गंध आपल्या रंध्रारंध्रात साठवित काव्याच्या मैफिलीत मोहित होणे म्हणजे एक पर्वणीच..!
अशा या त्रिमूर्तींची सोबत एकाच ताटातील लवणाभिषेक केलेले अन् भट्टीत खरपूस भाजलेले काजूगर अलगद सोलून खाताना त्या काजूचे गुण वैशिष्ट्य सांगताना आपण कुणीतरी तत्त्वज्ञ असल्यासारखे भासत होते.. अन् रिसॉर्ट मध्ये तासभर उभं राहून नायगावकरांचे जगभर फिरलेले अनुभव ऐकणे म्हणजे आपणच जग फिरत असल्याचे जाणवत होते.. हातवारे करून मान हलवून सालस गोड आवाजात त्यांच्या गप्पा ऐकताना पाय सुद्धा दमणे विसरले अन् मंत्रमुग्ध होऊन गप्पांत रमले होते.. रिसॉर्ट मधील बागेत फिरताना एका एका झाडाची माहिती घेण्याची अन् त्याची वैशिष्ट्ये सांगण्याची त्यांची आवड भारी विलक्षण होती.. विषय कुठलाही असो त्यावर भाष्य करणे अन् दिलखुलासपणे दुसऱ्याचे कौतुक करणे हे त्यांच्यासारख्या साहित्यिकांकडून शिकावे..
प्रा.अशोक बागवे यांचे चालता चालता आपुलकीने अलगद खांदावर हात ठेऊन आपल्यातलेच एक असल्यासारखे वावरणे म्हणजे आपण कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर असणे…अन् जिथून यशोशिखरावर चढण्यास सुरुवात केली ती वाट विसरायची नाही.. असाच जणू संदेश देणे होय..! कितीही मोठे पुरस्कार, श्रेष्ठत्व मिळालं तरी मोठेपणा त्यागून माणूस जेव्हा छोट्या माणसांत रमतो..लहान थोर भेदभावाच्या रेषा पुसून स्नेह प्रेम बंधुभावाच्या गाठी बांधतो.. उंची केवढी ही असो पण.., तेव्हाच तो माणूस आपोआपच श्रेष्ठ म्हणून गणला जातो..
कवीच्या नादाला कुणी लागायचं नाही म्हणणारे माजी आमदार कवी रामदास फुटाणे असो की आपला मायेचा उबदार हात खांदावर ठेऊन मी सोबत आहे असे प्रत्यक्षात दाखवणारे कवी प्रा.अशोक बागवे असो की, रेल्वेतून येताना कोकणातील निसर्ग पाहून…” कोकणातील हिरवागार निसर्ग फारच सुरेख आहे, फक्त झाडे मध्ये येतात..” अशी मिश्किल टिपण्णी करणारे कवी अशोक नायगावकर…
अशा या दिग्गज त्रिमुर्तींसोबत घालविलेले काही तास म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय भेट…जणू मंतरलेलेच क्षण..!
*ती भेट कधी ना विसरावी..*
*क्षणोक्षणी ती उरी जपावी..*
*भेटेल कधी कुणी कुठेही..*
*आठवणींची कुपी ठरावी..*
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६