*विक्रमी हळदीकुंकू समारंभ*
आज आपण सगळे तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत. जसा काळ बदलत असतो तसे समाज परिवर्तन सुध्दा होत असते. आपण आपली संस्कृती जपायलाच हवी. आपण आज बहुतेक जण शिक्षित आहोत. आपल्या परंपरा चाली रिती म्हणून आपली वयस्कर माणसे जसे सांगत तसे वागत गेलो. काही गोष्टी आम्हाला अजिबात पटत नव्हत्या. तरी वडीलधारी माणसांचे ऐकून, त्यांचा मान राखावा म्हणून एकत राहिलो. शिक्षित असून सुध्दा अडाणीपणच अंगी मुरवले होते.
आज आई, सासू, मुली, सुना सर्व जणी शिकलेल्या आहेत. आपलं घर, संसार, नौकरी, उद्योग सगळे सांभाळून समाजात अभिमानाचे स्थान पटकावत आहेत आणि ह्या सर्वांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो.
पुणे, येथील आमच्या सोसायटीच्या सिनियर सिटीझन महिलांनी एक आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ गेल्या शुक्रवारी, दिनांक २४/०१/२५ रोजी, संध्याकाळी सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये थाटात संपन्न केला. ह्या सोसायटीत आठ आठ माळ्यांच्या सहा ईमारती आहेत. एकूण १६० फ्लॅट असून, ह्या समारंभाला जवळ जवळ दिडशे दोनशे बायका हजर होत्या. प्रत्येक बाईची ओटी व वाण म्हणून एक किलोची गुळाची ढेप ही दिली होती.
हळदीकुंकू समारंभाचा एकूण खर्च सिनियर सिटीझन पैकी काही मोजक्या बायकांनीच उभारला होता. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट!
हळदी कुंकू म्हटले की तो बायकांचा, नटण्या मुरडण्याचा, सौभाग्यवती व सवाष्ण बायांचा. काही कारणाने नवरा स्वर्गवासी झाला तर त्यांच्या बायकोला हळदीकुंकू समारंभापासून वंचित व्हायला लागायचे. स्वत: ती स्त्री सुध्दा स्वतःला विधवा समजून अशा कार्यक्रमांपासून. स्वत:ला दूर ठेवायची.
पण कालच्या हळदीकुंकू समारंभाला सिनियर बायांनीच प्रत्येक घरा घरात जाऊन सर्वांना आग्रहाचे आमंत्रण दिले.
आणि तेवढ्याच उत्साहाने सगळ्या स्त्रिया, त्यात काही घटस्फोटीत, विधवा, तरूण, नवीन लग्न झालेल्या व वयस्कर एकत्रित येऊन एकोप्याने, उत्साहाने सहभाग घेऊन हळदीकुंकू समारंभ जल्लोषात साजरा केला. हळद कुंकू लावून, गुलाब पुष्प देऊन, वाण व ओटी भरून हं! सोबत मस्त नाश्ता देऊन व मस्त फोटो सेशन करून सर्वांच्या मनो मनी आनंदी आनंद भरला.
माझे मन आनंदाने भरून आले. आमच्या सोसायटीच्या सिनियर सिटीझनचा हा उपक्रम समाज प्रबोधन करणाराच ठरला ह्यात शंकाच नाही!
ह्या उपक्रमाचा बोध बाकीच्या बायकांनी ही घ्यावा व आपल्या जुन्या प्रथा मोडून टाकायला पुढे सरसावे असे मला वाटते.👍
*शोभा वागळे*
मुंबई.
8850466717