सिंधुदुर्ग बदलतोय असे बॅनर अडीज वर्षांपूर्वी मालवण येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने लागले आणि जिल्ह्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी रवींद्र चव्हाण असतील हे स्पष्ट झाले. जिल्ह्याची धुरा राणे, केसरकर नव्हे तर डोंबिवली येथून निवडून आलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या हाती गेली. संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि कुठलीही सत्ता उलथून टाकण्याची धमक अन् कोणालाही निवडून आणण्याची ताकद असलेले, कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभे राहणारे कणखर नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे. पडद्या आडून जिल्हा बँक ताब्यात घेणे असो की ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, सावंतवाडी नगरपरिषद निवडणुका रवींद्र चव्हाण म्हणजे विजय हे समीकरण बनले. परंतु निवडणुका जिंकल्या, सत्ता मिळाली तरी सिंधुदुर्ग बदलला नाही, ते केवळ दिवास्वप्नच ठरले.
एकेकाळी तळकोकण म्हणजे नारायण राणे अशीच जिल्ह्याची ओळख बनली होती. बॅरिस्टर नाथ पई, मधु दंडवते अशा दिग्गजांनी थेट संसदेत आपली छाप पाडली ते सिंधुदुर्ग जिल्हातून संसदेवर गेलेले लोकप्रिय नेते.. नव्वदीच्या दशकात हळुहळु त्यांची जादू ओसरत गेली आणि जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणे यांचा उदय झाला नि “राणे पर्व” सुरू झाले. जिल्ह्यातील गावकरशाही लोप पावत गेली अन् ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते राणेंच्या सोबत राहिले ते मोठे झाले. जिथे कधी डांबरी रस्ते होतील अशी अंधुकशी आशा नसलेल्या ठिकाणी मजबूत रस्ते, साकव, वीज आणि पाणी सुविधा निर्माण झाल्या. राणे येताच जादू झाली नाही. परंतु दांडगी इच्छाशक्ती आणि हिमतीच्या जोरावर हळूहळू बदल घडत गेला, अन् राणे मुख्यमंत्री होताच जिल्ह्यात विकासाने भरारी घेतली. राणेंच्या आसपास असलेल्या काहींनी केलेल्या चुका राणेंना महागात पडल्या आणि राणेंची दहशतवाद हा मुद्दा उपस्थित करून केसरकरांनी राणेंना कोंडीत पकडले. एकहाती असलेली राणेंची जिल्ह्यावरची पकड हळूहळू सैल झाली. ज्या केसरकरांचा राजकीय उदय सावंतवाडी नगरपरिषद मध्ये राणे यांच्यामुळेच झाला तेच केसरकर राणेंना पुरून उरले अन् अडिज दशक जिल्ह्यावर असलेली राणेंची सत्ता पालथवून केसरकर पालकमंत्री झाले.
कधीच कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो. सत्ता केंद्रस्थानी मानून राणे केसरकर दिलजमाई झाली. लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी राणेंना मदत केली. त्यामुळे राणेंनी विधानसभेसाठी केसरकर यांना पाठबळ दिले. केसरकर निवडून येणार नाहीत अशी वल्गना करणारे तोंडघशी पडले आणि केसरकर पुन्हा एकदा बाजी मारून सलग चौथ्यांदा आमदार झाले. परंतु शह काटशहाच्या स्पर्धेत केसरकरांना मंत्रिपद मिळाले नाही आणि राणेंचे धाकटे चिरंजीव जिल्ह्यातून एकमेव कॅबिनेट मंत्री झाले. जिल्ह्यातील ज्या कुडाळ मालवण मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव झाला त्याच मतदारसंघातून वैभव नाईक यांना चारीमुंड्या चित करीत राणेंचे थोरले चिरंजीव डॉ.निलेश राणे विजयी झाले. पराभवाचा बदल विजयाने घेत दत्ता सामंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली निलेश राणेंनी सत्ता काबीज केली. पालकमंत्री पदाच्या शर्यतीत जिल्ह्यातून एकमेव कॅबिनेट मंत्री झालेले नितेश राणे यांच्या हाती जिल्ह्याचे पालकत्व आले….आणि
*पुन्हा एकदा राणे पर्व सुरू झाले…*
नाम.नितेश राणे हे नारायण राणेंच्या मुशीतून तयार झालेले धडाकेबाज नेतृत्व..! नारायण राणेंच्या सारखीच कुणालाही भिडण्याची त्यांच्यात धमक.. एकदा शब्द दिला की तो खरा करणार हे नेतृत्व..! एकेकाळी आपल्याच सोबत असलेल्या परंतु विरोधात उभे राहिलेल्या सतीश सावंत आणि संदेश पारकर यांना मोठ्या मतांच्या फरकाने आस्मान दाखविल्याने एकटा नितेश भारी पडू शकतो हे संपूर्ण जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने पाहिले आहे. कोणताही स्टार प्रचारक मतदारसंघात न आणता त्यांनी आपला मतदारसंघ केवळ राखलाच नाही तर सर केला. नितेश राणेंचा पराभव करणे सर्व विरोधकांना एकत्र येऊनही शक्य झाले नाही आणि नजीकच्या काळात कधी होईल असेही चित्र दिसत नाही हे मात्र खरे. नितेश राणे म्हणजे धडाडती तोफ.. चुकीच्या वेळी कोणी समोर आला तर त्याचे खरे नाही. चूक करणारा नेता असो किंवा अधिकारी त्याला माफी नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने देखील त्याचा धसका घेतला. कणकवली येथील बांगलादेशी महिला प्रकरण हे त्याचे पहिले उदाहरण जे पोलिसांच्या अंगाशी आले. नितेश राणेंचा धसका घेऊन जिल्ह्यातील मटका स्टॉल अचानक बंद झाले हे दुसरे उदाहरण ठरले.
भाजपला ज्या पद्धतीचे उमदे, आक्रमक नेतृत्व पाहिजे ती आक्रमकता नितेश राणे यांच्या अंगी पुरेपूर भरलेली आहे. मतदान प्रक्रियेच्या दरम्यान ज्या समाजाच्या धर्मगुरूंनी फतवे काढून भाजपला मतदान न करण्याबाबत सूचित केले होते, त्यांना सज्जड दम भरण्याची हिंमत नितेश राणेंनी दाखवून भाजपला अभिप्रेत असलेला नेता कसा असावा याचे उदाहरण दिले होते. मशिदींवरील भोंगे असो वा हिंदू समाजावर होणारा अन्याय, नितेश राणे त्यावर परखड भूमिका जाहीरपणे मांडतात त्यामुळे अनेकांना नितेश राणेंमध्ये ऐन उमेदीतील नारायण राणेंची छबी दिसते. आपले विचार परखडपणे मांडण्याची त्यांची वृत्तीच त्यांच्यातील खरा राजकारणी दाखवून देतो. आश्वासन द्यायचं तर ते पूर्ण करायचं अन्यथा त्या रस्त्याला जायचं नाही ही त्यांची सवय त्यांना यशस्वी राजकीय नेता बनविते. कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान करणे हा बाणा परंतु कार्यकर्ता चुकला तर समोरासमोर धडकून धडा शिकविण्याची पद्धत कार्यकर्त्यांमध्ये आदरयुक्त भीती राखते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नितेश राणे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची पालकमंत्री म्हणून गरज होती आणि जिल्हावासियांना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत ज्या आजपर्यंत इतर पालकमंत्र्यांकडून पूर्ण झाल्या नाहीत. जिल्ह्यात सुरू असलेली खुलेआम दारू वाहतूक, अवैध दारू विक्री, अळंबी उगवतात तशा रोज उभारल्या जाणाऱ्या मटका टपऱ्या, मोठमोठ्या बंगल्यात सुरू झालेला मटका व्यवसाय, खुलेआम खाकीच्या आशीर्वादाने सुरू असलेले जुगार, गेम पार्लरच्या नावावर सुरू असलेले जुगार, चरस गांजा विक्री यावर पालकमंत्री म्हणून नितेश राणेंनी वचक बसवावा अशी अपेक्षा आज जिल्ह्यातील सुजाण नागरिक बाळगून आहेत. नक्कीच आपला आक्रमक स्वभाव जिल्हा विकास आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी नितेशजी कामी आणतील यात शंकाच नाही.