You are currently viewing एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

*एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक*

*कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन*

*एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक*

*दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते*

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ बसस्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकविण्यात आले. एसटी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो! गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो! महायुती सरकारचा निषेध असो! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. तसेच झालेली दरवाढ सामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

यावेळी वैभव नाईक म्हणाले, निवडणुकीपूर्वी सरकराने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या. सरकार विरोधी वातावरण असल्याने अनेक सवलती,वारेमाप आश्वासन देण्यात आली होती. आता निवडणूक झाल्यानंतर एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारने जनतेची लूट सुरु केली आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळाकडून नागरिकांना सुविधा पुरविल्या जात नाहीत. वस्तीच्या गाड्या बंद केल्या जात नाहीत. गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सर्वच खात्यांचा कारभार ते स्वतः चालवत आहेत. मंत्र्यांना पीए कुठले द्यायचे, १०० दिवसात खात्यांना कार्यक्रम कोणता द्यायचा इथपर्यंत सगळं देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत. महायुती सरकार फक्त नावाला आहे. चांगली योज़ना असेल तर सर्वजण त्याचे श्रेय घेतात. मात्र एसटी भाडेवाढ झाल्यानंतर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. मात्र हि दरवाढ पूर्ववत झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
संजय पडते म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅसची झालेली दरवाढ जनता सोसत असताना आता एसटी तिकिटातहि १५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. दररोज एसटी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना हि दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तिकीट वाढल्याने सुट्ट्या पैशांसाठी कंडक्टर आणि नागरिक यांच्यात वाद होणार आहेत.आता हळूहळू सर्वच गोष्टींच्या किंमती महायुती सरकार वाढविणार आहे. हि दरवाढ रद्द करण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार आहोत जनतेनेही लढयात सहभागी झाले पाहिजे. तरच दरवाढ रोखता येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकासंघटक बबन बोबाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, किरण शिंदे, उदय मांजरेकर,सचिन काळप,गंगाराम सडवेलकर, तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, अमित राणे, गुरु गडकर, जान्हवी पालव, दीपश्री राऊत, वेदिका दळवी, सागर भोगटे,मंगेश बांदेकर, अशपाक कुडाळकर, दीपक धुरी, नितीन सावंत,दाजी आईर,सचिन ठाकूर, श्री. कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा