अमरावती दि. 27 –
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात व देशात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत महिनाभर स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमा अंतर्गत मिशनचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी विविध महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये तसेच संस्थांमध्ये जाऊन विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च कुठल्याही प्रकारचे मानधन घेण्यात येणार नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात आज दिनांक 27 जानेवारी 2025 पासून झारखंड येथील राची हटिया या जिल्ह्यापासून झाली असून समारोप रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील खेड या गावाला होणार आहे. हे अभियान संपूर्ण महिनाभर चालणार असून महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी या विद्यार्थी जनजागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिशन आयएएस ही भारतातील प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेने आतापर्यंत संपूर्ण भारतात 16155 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. विशेष म्हणजे या संस्थेमार्फत दुसऱ्या वर्गापासून फक्त एक रुपयांमध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते शिवाय मुलांना विनामूल्य पुस्तके व सराव परीक्षा ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या संस्थेच्या विविध उपक्रमात आतापर्यंत 273 आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रितअधिकारी सहभागी झाले असून संस्थेने स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत .संस्थेने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल जनमानसांमध्ये समाधान दिसत असून अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003