You are currently viewing ऑन कॉल रक्तदाते संस्थेतर्फे रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव

ऑन कॉल रक्तदाते संस्थेतर्फे रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव

सावंतवाडी :

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १०० हून अधिक रक्तदात्यांचा आज प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सर्व रक्तदात्यांचा ग्रुप इन्शुरन्स सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी स्पष्ट केले.

ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग ही संस्था १४ जून २०२४ या जागतिक रक्तदान दिनी स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच या संस्थेचे एक हजाराहून अधिक सदस्य झाले आहेत. या संस्थेच्या रक्तदात्यांचा सन्मान गौरव सोहळा सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील सार्थक फाउंडेशनचे संयोजक सुदेश नार्वेकर, सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम सावंत भोसले, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस उपस्थित होते. त्यांच्यासह व्ही. व्ही. नाईक, सतीश कविटकर, सचिव बाबली गवंडे, उपाध्यक्ष मीनल सावंत, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सदस्य दिनेश गावडे, बाळकृष्ण राऊळ, सचिन कोंडये, जितेंद्र पंडित, रवींद्र तावडे, सुधीर पराडकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुदेश नार्वेकर व युवराज लखम सावंत भोसलेयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुदेश नार्वेकर म्हणाले, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या संस्थेला आपले सर्व सहकार्य राहील सार्थक फाउंडेशनतर्फे तुम्हाला सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रमुख पाहुणे युवराज लखम सावंत भोसले म्हणाले, ऑन कॉल रक्तदाते संस्था रक्तदान करण्याचे महान कार्य करत आहे. या रक्तदानातून अनेकांना जीवदान मिळत आहे. उत्तरोत्तर या संस्थेचे कार्य अधिकच वाढत जावो त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक दयानंद गवस म्हणाले, ही संस्था सामाजिक हेतूने स्थापन झाली आहे. रक्तदान करणे हे आमचे महत्त्वाचे काम आहे. रक्तदात्यांचे विमा उतरण्याचे काम आम्ही करणार आहोत. स्वतःच्या खर्चाने ते गोवा मेडिकल कॉलेज असेल किंवा जिल्हा रुग्णालय येथे रक्तदाते धाव घेतात. त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. ग्रुप इन्शुरन्स उतरवण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य हाती घेतले आहे. रक्तदात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हे कार्य पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

यावेळी १५४ रक्तदाते व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते व महिला तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी तर प्रास्ताविक बाबली गवंडे यांनी केले.शेवटी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा