मुंबई –
तुम्ही जिथे बसला आहात तिथे मी अठरा वर्षांपूर्वी बसले होते. तेथूनच माझा प्रवास सुरू झाला तो आज जर्मनीत जाऊन कार्यरत झाले. मी शिवाई विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान आहे असे माजी विद्यार्थी निकिता अक्षय भावे हिने दि. २४ रोजी शाळेच्या तिळगुळ समारंभ व वार्षिक संमेलनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून, पालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी श्री देवी सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन शाळेच्या सचिव गौरी भोईर, निकिता भावे, चारूशिला चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद कांदळगावकर, मुख्याध्यापक रतन भालेराव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका नेहा भाबल, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर परब आदींच्या हस्ते करण्यात आले. निकिता भावे पुढे म्हणाल्या की, तुम्हाला अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी विविध क्षेत्रात पर्याय आहेत. त्यासाठी आपल्याला तीन भाषा आल्या पाहिजेत किंबहुना भाषा ही भाषा आहे. गरजेनुसार इतर भाषांचा अभ्यास करा. खरंच प्रगत देशात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी चांगला अभ्यास व प्रयत्न केल्यास भविष्य उज्ज्वल आहे असे नमूद केले. यावेळी माजी विद्यार्थी चारूशिला चव्हाण-सावंत, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद कांदळगावकर, डॉ. रंजना तामोरे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शौर्य हस्तलिखिकाचे प्रकाशन सचिव गौरी भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या सदर हस्तलिखित सर्व वर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी वाचावे असे संपादित करण्यात आले आहे. यासाठी महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कानोलकर आणि सहशिक्षिका यांनी परिश्रम घेतले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा भाबल यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीमय वाटचालीचा आढावा घेत असताना आपले नाते तिळगुळासारखे गोड असावे असे सूचित केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय यासोबतच कोळी संस्कृती, देशाभिमान जागृत व्हावा अशी नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अश्विनी कानोलकर यांना संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रिया कोरगावकर, संजय झनके, सुरेखा उजगरे आदी शिक्षकांनी संयुक्तिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या रंगतदार समारंभाचे सूत्रसंचालन तनुजा भाये यांनी केले. सर्वांना तिळगुळ लाडू व फुले वाटून समारंभाची सांगता झाली. आभार प्रदर्शन सहशिक्षिका मानसी खोत यांनी केले.
शिवाई विद्यामंदिर शाळेच्या वार्षिक संमेलनानिमित्त शौर्य हस्तलिखिकाचे प्रकाशन सचिव गौरी भोईर करीत असताना प्रमुख पाहुण्या निकिता भावे, चारूशिला चव्हाण, उपसचिव डॉ रंजना तामोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद कांदळगावकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका नेहा भाबल, मुख्याध्यापक रतन भालेराव, आदी मान्यवर प्रकाशचित्र दिसत आहेत.