४२९ प्राथमिक शाळा व ६१ माध्यमिक विद्यालयांना मिळणार लाभ
कुडाळ मालवण विधानससभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात येणार आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ४२९ प्राथमिक शाळा व ६१ माध्यमिक विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप होणार आहे.
यामध्ये कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना गुरुवार २१ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता कुडाळ पंचायत समिती सभागृह येथे थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात येणार आहे.
तर मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना शुक्रवार २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शाळा, विद्यालये कोरोना आजाराचे नियम व अटी तसेच आवश्यक काळजी घेऊन सुरु करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, विद्यालयांच्या प्रवेशद्वारावर शिक्षक, विद्यार्थी तसेच शाळेत भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आत सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व हि तपासणी सुलभ व्हावी या उद्देशाने आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून कुडाळ-मालवण मतदार संघातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात येणार आहे.
तरी त्या त्या तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक/शिक्षक, किंवा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी वरील दिलेल्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळचे उपसभापती जयभारत पालव व जि.प.सदस्य हरी खोबरेकर यांनी केले आहे.