You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर ^राणे पॅटर्न^ ची चर्चा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर ^राणे पॅटर्न^ ची चर्चा.

विशेष संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास २५ वर्षे राणेंनी अधिराज्य गाजविले होते. ग्रामपंचायत पासून राज्यातील विविध निवडणुकांमध्ये राणेंचा दबदबा होता. नारायण राणे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सुद्धा सोपविली होती. कित्येकवर्षं जिल्ह्यासह राज्यात नेतृत्व करणाऱ्या नारायण राणे यांना बॅकफूटवर आणलं आणि राजकीय वलय कमी केले ते तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार आणि आत्ताचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनीच.
नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने काँग्रेसकडे गेली होती. काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्याभोवती मर्यादित राहिलेला. काँग्रेसची कार्यपद्धती ही हायकमांड च्या आदेशाने सुरू होणारी, त्यामुळे नारायण राणे यांच्या तिथे टिकाव लागला नाही. जिल्ह्यात नारायण राणे यांच्या दादागिरी, दहशतवाद, आणि दबंगगिरी वर राजकारण करत दीपक केसरकर यांनी त्यांना नामोहरम केलं. जिल्ह्यातील जनतेला राणे यांच्या विरोधात उभे करत केसरकरांनी राणे यांना जिल्ह्यात प्रभाव पहायला लावला. वैभव नाईक सारख्या नवख्या उमेदवाराने राणेंना धोबीपछाड दिला तर खासदार निलेश राणेंना विनायक राऊत यांनी मुंबईतून येऊन खासदारकीच्या निवडणुकीत दोनवेळा पछाडले. त्यामुळे दीपक केसरकर हे जिल्ह्यात राणेंना भारी पडल्याचे दिसून आले. केसरकरांचे जिल्ह्यात वलय निर्माण झाले आणि शिवसेनेला सुद्धा गतवैभव प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदच्या जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्या होता. परंतु केसरकरांची मंत्रिपदाची कारकीर्द ही अनेकांना दुखावणारी झाली, स्वच्छ चारित्र्याचा माणूस सत्तेच्या राजकारणात मागे पडतो तसेच केसरकर देखील स्वकीयांच्याच चालींमुळे मागे पडले. पक्षातीलच नाराजांनी केसरकरांवर शिरसंधान साधत त्यांना जिल्ह्याच्या राजकारणापासून अलिप्त ठेवले त्याचेच परिणाम म्हणजे ज्यांनी नारायण राणे यांचा वारू रोखला होता तेच नारायण राणे भाजपामध्ये प्रवेशकर्ते झाले आणि जिल्ह्यातील सत्तास्थानी पुन्हा एकदा विराजमान झाले.
भाजपा हा व्यक्तिनिष्ठ पक्ष नाही, त्याला संघाचे वलय आहे. त्यामुळे इथे व्यक्तीपेक्षा पक्ष महत्वाचा मानला जातो परंतु सत्तेसाठी पक्ष नेहमीच नेते आणि कार्यकर्ते यांच्या पाठीशी असतो. त्यामुळे भाजपामध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्या पाठीशी पक्ष खंबीर उभा राहिला आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जिल्ह्यात आत्ताच झालेल्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा ५७ ग्रामपंचायत ताब्यात घेत पहिल्या स्थानी विराजमान झाला त्यातूनच नारायण राणे यांचे वलय आजही जिल्ह्यात असल्याचे सिद्ध झाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात नारायण राणे यांच्या समर्थनार्थ पोष्टर लागली आहेत ज्यात *राणे पॅटर्न* असा मजकूर लिहिलेला असून *राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार* हे देखील अधोरेखित केलेलं आहे.
दीपक केसरकर यांचे मंत्रिपद आणि पालकमंत्री पद गेल्यानंतर जिल्ह्यात शिवसेना वाढण्यापेक्षा मागेच पडत गेली. कुडाळमध्ये काही ग्रामपंचायत ताब्यात आल्या तरी मालवण, वैभववाडी, देवगडमध्ये भाजपाने सरशी केली. राणे आणि केसरकर यांच्याच नेतृत्वाभोवती जिल्ह्याचे राजकारण गेली १० वर्षे सुरू आहे. राणेंना शह देत केसरकर पुढे राहिले होते, परंतु सध्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा राणे यांनी भाजपातून जोरदार मुसंडी मारत केसरकरांना मागे टाकले. खरंतर केसरकर या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यक्तिशः मैदानात उतरलेच नव्हते. जिल्ह्याचे पालकत्व रत्नागिरीचे नेते आणि राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे असल्याने सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय करिष्मा करतात हे देखील ते लांब राहून पाहत असतील. परंतु पक्षीय काटशहाच्या राजकारणात शिवसेना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅकफूटवर गेली आणि त्याची जबाबदारी ही केवळ सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचीच असेल यात शंकाच नाही.
जिल्ह्यात सेना बॅकफूटवर गेली तरी भाजपावासी झालेले खासदार नारायण राणे पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपटावर स्वार झाल्यामुळे दीपक केसरकर मैदानात उतरले नसून देखील भाजपाला आणि पर्यायाने राणेंना मिळालेल्या यशामुळे केसरकर मागे आणि राणे पुढे गेल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा