You are currently viewing पोलिसांनी घेतला पालकमंत्र्यांच्या दबंगिरीचा धसका

पोलिसांनी घेतला पालकमंत्र्यांच्या दबंगिरीचा धसका

*पोलिसांनी घेतला पालकमंत्र्यांच्या दबंगिरीचा धसका*

*सावंतवाडी शहरातील मटका स्टॉल अचानक बंद..?*

संवाद मिडियाने सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत नव्याने अनधिकृत मटक्याच्या टपऱ्या उभ्या राहिल्याची बातमी प्रसिद्ध केली आणि शहरात मटका व्यवसाय करण्यासाठी वेगाने टपऱ्या उभारण्याचे काम सुरू असल्याने शहर ऐतिहासिक शहर नव्हे तर टपऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल की काय..? अशी भीती व्यक्त केली होती.. आणि गुरुवारी अचानक दिवसभर मटका उद्योगाच्या टपऱ्या बंद असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे “आम्हीच ज्यांना मोठं केलं त्यांचीच आमच्या धंद्यावर गदा..?” अशी बोलकी प्रतिक्रिया मटका व्यावसायिकांमध्ये ऐकायला मिळाली. याचाच अर्थ…”नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यांच्या दबंगगिरीचा धसका पोलीस प्रशासनाने घेतला आणि मटका टपऱ्या बंद ठेवण्याचे फर्मान काढले का..? अशी शंका उत्पन्न होत आहे.

कणकवली येथील लॉजिंग वर मिळालेल्या बांगलादेशी महिला रेल्वे स्टेशनवर मिळाल्याचे भासवणाऱ्या पोलिसांचे पितळ उघडे पडल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका पोलीस प्रशासनाला घाम फोडणारी ठरली आणि भविष्यात आपले काय होणार..? याची चिंता सतावत असल्याने मटक्याचे बालंट डोक्यावर कोण घेणार..? म्हणून तर नितेश राणे यांची भीती दाखवून मटका टपऱ्या बंद करायला लावल्या. त्यामुळेच मटक्याचे किंग अशा प्रकारची बोलकी प्रतिक्रिया देऊन आपण आपले काळे धंदे सुरू ठेवण्यासाठी राजकीय आश्रय घेत असल्याचे अप्रत्यक्षरीत्या कबूल करत आहेत. मटक्यावाले जरी नाराज झाले तरी जागरूक नागरिकांकडून मात्र अवैध्य धंदे बंद असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

संपूर्ण जिल्ह्यात अवैध्य धंदे जोरदार सुरू असून गावोगावी जुगाराच्या मैफीली आणि टपऱ्यांवर राजरोसपणे मटका घेतला जातो. यामध्ये मटका खेळणारे कधीतरी पैसे कमावतात आणि रोज गमावतात परंतु मटक्याचे किंग मात्र ऐशोआराम अनुभवतात. त्यांची घरे मजल्यांवर मजले चढतात आणि गरीब कामगार वर्ग मात्र बेघर होतोय. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध्य धंद्यांवर हातोडा बसलाच पाहिजे आणि जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नक्कीच हातोडा मारण्याचे काम करतील अशी जनतेला आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा