मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या कुलाबा परिसरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा 9 फूट उंच असा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणारा आहे.
या पुतळ्याच्या उभारणीचे काम गेली चार वर्ष सुरू होते. गेल्यावर्षी या पुतळ्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु, जी जागा मुंबई महापालिकेनं ठरवली होती. त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता म्हणून ही जागा बदलून घेण्यात आली होती. परंतु, नव्या जागेसाठी ही नवनवीन परवानगी मिळवावी लागणार होती. याचे काम पूर्ण होईपर्यंत 23 जानेवारी 2020 हा दिवस निघून गेला होता. “अखेर यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला मुहूर्त सापडला आहे.”
23 जानेवारी 2021 ला आता या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी हा पुतळा तयार केला असून त्याचे काम जोगेश्वरी मातोश्री क्लब पूर्ण करण्यात आले आहे. सध्या हा पुतळा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात चौथऱ्यावर उभा करण्यात आला असून या चौथर्याच्या खाली बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना या ओळींचा वापर करायचे त्या ओळी कोरण्यात आलेले आहे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ असे हे शब्द असून या पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तु संग्रहालयाच्या दिशेने आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या शब्दांनी यांचे भाषण संपवायचे ते शब्द म्हणजे ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ हे सुद्धा या पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर करण्यात आलेले आहे. 23 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. हे निमंत्रण विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही देण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः कृष्णकुंजवर गेल्या होत्या आणि राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला येणार असल्याची आश्वासन दिल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.