You are currently viewing मतीन भोसले आणि त्याची प्रश्नचिन्ह ही आश्रम शाळा  

मतीन भोसले आणि त्याची प्रश्नचिन्ह ही आश्रम शाळा  

अमरावती :

 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह या आदिवासी आश्रम शाळेत दोन दिवसांचे बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या शाळेचे सर्वेसर्वा श्री मतीन भोसले हे आहेत. ते फासे पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांची प्रश्नचिन्ह ही शाळा चालवितात. त्यांचा मागे एकदा फोन आला. तो अडचणीत होता. मतीन म्हणाला सर किराण्याची काहीच सोय नाही. काही मदत करू शकाल काय ? मी लगेच माझे मित्र श्री राधेश्यामजी भुतडा यांना फोन लावला. त्यांनी त्यांच्या परिचयातून मतीनला एक लाख रुपयाचा किराणा घेऊन दिला. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण मतींनच्या प्रश्नचिन्ह या शाळेला आपल्या परीने आर्थिक स्वरूपात किराण्याच्या स्वरूपात मदत करावी यासाठी मी हा लेख लिहीत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या चौकाचौकात उभे राहून भीक मागणाऱ्या गल्लीबोळात फिरून भंगार गोळा करणा-या व ते विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या फासे पारधी समाजातील मुलांना गोळा करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे तसे फार अवघड काम. पण अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एक तरुण पुढे आला. या मुलांच्या जीवनात व त्या कुटुंबांच्या जीवनात अभिनव क्रांती घडवून आणली. या तरुण तडफदार झंजावाती मुलाचे नाव आहे मतीन भोसले. मतीनच्या प्रश्नचिन्ह या शाळेची आज संपूर्ण महाराष्ट्र चर्चा आहे. अगदी सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतलेली आहे. विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपती या मालिकेमध्ये काल-परवाच त्याची मुलाखत झाली. प्रश्नचिन्ह च्या शाळेचा नुकताच वर्धापन दिवस संपन्न झाला. १० वा वर्धापन दिवस. प्रमुख पाहुणे होते नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या श्रीमती मेधा पाटकर आल्या होत्या. आज शाळा चालवणे अवघड झाले आहे. तिथे मतीनने फासे पारधी समाजातील जवळपास पाचशे मुलांना शिक्षणाचा मूलमंत्र देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. आणि या दहा वर्षात मतीन भोसले यांचा खूप संघर्ष करावा लागला. त्याच्या संघर्षावर एक चित्रपट निघू शकेल. एक जाडजूड ग्रंथ होऊ शकेल. अशी परिस्थिती आहे. पण तो खचला नाही. पद्मश्री बाबा आमटे एका कवितेमध्ये म्हणतात. शृंखला पायीच असू दे. मी गतीचे गीत गाईन. दुःख झेलण्यास आता. आसवांना वेळ नाही. याप्रमाणे तो संघर्ष करीत राहिला. खरं म्हणजे ज्यांना शिक्षणाचा गंध नाही. त्यांना तयार करणे. त्यांच्या आई-वडिलांना तयार करणे. हे मोठे अवघड काम. पण मग मतिनने ते समर्थपणे पेलले. अनेक संकटे आली. पण त्या संकटावर तो मात करून गेला. आणि आज प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभी आहे. प्रश्नचिन्ह शाळा उभारतांना आलेल्या संकटाची मालिका भव्य दिव्य आहे. नुकताच सर्वत्र चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग प्रश्नचिन्हाच्या सगळ्या स्वप्नांचा चुराळा करून गेलेला आहे. हा समृद्धी महामार्ग शाळेमधून गेला. शाळेच्या इमारती. वसतिगृह ग्रंथालय या सर्वावरून बुलडोजर फिरला. शासनाने किंवा संबंधित यंत्रणेने जशी पाहिजे तशी नुकसानभरपाई दिली नाही. अजूनही त्या संदर्भात मतीनच्या शासन दरबारी येरझारा सुरूच आहेत. हा तरुण थकला नाही आणि थकणारही नाही. मी मतीनला पाहतो. अधून मधून प्रश्नचिन्ह शाळेला भेट देतो. माझे सहकारी आणि मिशन आयएएसचे सहसंचालक प्रा. प्रवीण खांडवे सर त्याच्या शाळेचे नकाशे तयार करून देतात. वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करतात. मित्रांनो आज मतीन भोसले एका झंजावातासारखा काम करीत आहे. खरं म्हणजे आज शाळा एक व्यवसाय झालेला आहे आणि व्यावसायिक जगात एक दीपस्तंभ खंबीरपणे उभा आहे आणि त्या दीपस्तंभाचे नाव आहे मतीन भोसले. खरं म्हणजे अमरावती यवतमाळ रोडवर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा हे छोटसं गाव आहे या गावांमध्ये फाशी पारधी समाजाची वस्ती भरपूर आहे. आणि म्हणूनच मतीनने या गावाची निवड केली. या कामासाठी त्याला फासे पारधी समाजातील सर्वांनी मदत केली. मतीन पूर्ण महाराष्ट्रमध्ये फिरला. फासेपारधी समाजातील मुलांना गोळा केले. आणि त्यासाठी त्याने शासकीय नोकरी सोडली. खरं म्हणजे लोकांनी त्याला वेड्यात काढले. सरकारी नोकरी सोडून समाजसेवा करायला निघालेला तरुण आज महाराष्ट्रातील तरुणांना आदर्श असा ठरलेला आहे. त्याने जे काम केले त्याला तोड नाही. खरं म्हणजे त्याच्या या कार्याची दखल सर्वांनी घेतलेली आहे. श्रद्धेय पद्मश्री प्रकाश बाबा आमटे व मंदा आमटे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मदतीचे अनेक हात आले. अनेकांनी भरभरून मदत केली. आणि प्रश्नचिन्ह उभी राहिली. पण नुसतं शाळा उघडून चालत नाही. सुमारे पाचशे मुलांचा रोजचा जेवणाचा खर्च. राहण्याचा खर्च. कपड्यांचा खर्च. पुस्तकांचा खर्च अशा अनेक प्रश्नांचा ढिगच मतीनच्या समोर उभा राहिला. पण संपूर्ण महाराष्ट्रातील सहृदय मित्रांनी संस्थांनी आपले मदतीचे हात पुढे केले आणि आज प्रश्नचिन्ह १० वा वर्धापन दिवस साजरा करीत आहे ही खरोखरच म्हणजे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. साथी हात बढाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. याप्रमाणे आपण मतीनला आर्थिक मदत केली पाहिजे. कारण या मुलांना आज खरी गरज आपली आहे आणि प्रत्येकाने जर आपला खारीचा वाटा उचलला तर प्रश्नचिन्हचे बहुतेक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो. मतीन तुम्हाला रस्त्यावर भेटेल. चौकात भेटेल. शाळेत भेटेल. परंतु तो आजही तसाच आहे. साधा आहे. सरळ आहे. एवढे मोठे काम करूनही कुठलाही अहंकार नाही. अनेक वेळा त्याला या सर्व घडामोडींमध्ये तुरुंगात जावे लागले. केसेस लागल्या. पण त्याने हे काम सोडले नाही. शिव खेडा म्हणतो जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंगसे करते है. तो शासकीय नोकरीत राहिला असता तर त्याला चांगला पगार मिळाला असता. त्याचा संसार नीट झाला असता. परंतु या माणसाने नोकरीवर लाथ मारून स्वतः चे एक वेगळे विश्व निर्माण केले आहे. आणि आज अमरावती जिल्ह्याला भूषणावह असे त्याचे व्यक्तिमत्व झालेले आहे. मतीन सतत काम करतो. शाळेवर असला तरी आणि शाळेच्या बाहेर असता तरी. त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट कायम असते ती म्हणजे प्रश्नचिन्ह शाळेचा विकास. या शाळेसाठी त्याने चौकाचौकात राहून भीकही मागितली आहे. अगदी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून त्याने या मालिकेची सुरुवात केली. अनेकांनी टीकाटिप्पणी केली. परंतु त्याने आपला पिच्छा सोडला नाही. तो सतत विक्रम आणि वेताळप्रमाणे प्रश्नचिन्ह मागे धावत राहिला. आत्ताच या शाळेने आपला १० वा वर्धापन दिवस श्रीमती मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत साजरा केला आहे. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा देतो. आपण तन-मन-धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. या आपल्या आनंदात आपण प्रश्नचिन्हला सहभागी करून घेतले तर प्रश्नचिन्ह मधील मुलांचे चेहरे उजळल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्याला एकच काम करायचे आहे. जसे जमेल तसे कपडेलत्ते किराणा व इतर जिन्नस जर प्रश्नचिन्हाला पुरवले तर त्यांची प्रश्नचिन्ह ही आश्रम शाळा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने जर आपला खारीचा वाटा उचलला तर हा संकटाचा महामेरू तरल्याशिवाय राहणार नाही. मतीनच्या हा प्रवास असाच सुरू राहावा आणि आपली साथ अशीच सुरू राहावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. मतीन आगे बढो. हम तुम्हारे साथ है…!

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा