डोंबिवली :
“आज बघता बघता ३६ वर्षे पूर्ण झाली ती कशी गेली यांचे मागे वळून पाहताना आश्र्चर्य वाटते. खरंतर हे छोटेखानी मंडळ दिमाखाने उभे आहे ते तुमच्यातील चिकाटीने, जिद्दीच्या जोरावरच…” असे कोकणवासीय मित्र मंडळ डोंबिवलीचे विश्वस्त शशिकांत पराडकर यांनी ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्घाटनप्रसंगी बोलताना सूचित केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक चोपडेकर, सचिव रत्नाकर सारंग, खजिनदार बापू कुबल, युवा कार्यकर्ता सहदेव कोळंबकर आदींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, कोकणवासीय मित्र मंडळाची पन्नाशीच्या दिशेने प्रगतीमय वाटचाल सुरू असून त्यामुळे तुमची आमची जबाबदारी वाढली आहे. त्यातून विविधता आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे नमूद केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक चोपडेकर म्हणाले की, विश्वस्त शशिकांत पराडकर यांनी बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला असल्याने ती मार्गदर्शक तत्वे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करुया असे सांगितले. प्रारंभी मंडळाच्या गटप्रमुख महिला संघटक अनघा चोपडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की ,कोकणवासीय मित्र मंडळ आपल्या सर्वांचे आपलं एक आदर्शवादी कुटुंब म्हणून परिचित आहे यामध्ये बऱ्यापैकी उच्चपदस्थ पदावरून निवृत्त झालेले कोकणी मंडळी कार्यरत आहेत. त्यामुळे नेहमीच नवीन उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असल्याचे विशद केले. यावेळी वर्षभरात घेतलेल्या स्पर्धेत यश संपादन केलेल्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात अनघा चोपडेकर यांनी लिहिलेल्या मालवणी एकांकिका व इतर कार्यक्रमांनी संमेलनाची सांगता झाली. या रंगतदार समारंभाचे सूत्रसंचालन सहदेव कोळंबकर आणि भुषण मुणगेकर यांनी केले. पुन्हा पुढील वर्षी याच जोमाने भेटूया म्हणून सर्वांनी निरोप घेतला.