*वामनराव महाडिक विद्यालय, तळेरे येथे सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन दिमाखात संपन्न*
*विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण: ना.नितेश राणे*
शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा महत्त्वाचा गुण स्काऊट गाईडच्या माध्यमातून मिळतो. एकीकडे बारा बारा तास मुलं मोबाईल आणि इंटरनेट टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात अशा बदलत्या युगातही स्काऊट गाईड सारख्या उपक्रमातून भावी पिढीला चांगले वळण लावण्याचे काम केले जात आहे. स्काऊट गाईड मध्ये देशात आणि जगभरात नवनवीन कोणत्या संकल्पना राबवल्या गेल्या आहेत याचा अभ्यास करा आणि तो बदल आपल्या जिल्ह्यातही स्वीकारा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तदा मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री मा.ना.नितेश राणे,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर,उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,जिल्हा वित्त व लेखा अधिकारी राजश्री पाटील,सिंधुदुर्ग स्काऊट गाईड जिल्हा चिटणीस अफसरबेगम अवटी,कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, कणकवली पंचायत समिती माजी सभापती दिलीप तळेकर, जिल्हा वित्त व बांधकामाचे माजी सभापती रवींद्र जठार,प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,तळेरेे हायस्कूलचे सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,,हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
या भव्यदिव्य जिल्हा मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 28 स्काऊट-गाईड पथके, त्यामध्ये 600 विद्यार्थी व 100 शिक्षक उपस्थित आहेत.पुढील तीन दिवस विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था सिंधुदुर्ग यांच्या कब, बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा २०२५ चे तळेरे येथे उद्घाटन ना.नितेश राणे यांच्या हस्ते झाले..
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, तीन दिवस चालणार आहे या स्काऊट आणि गाईडच्या मेळाव्यात असंख्य गोष्टी मुलांना शिकायला भेटतील. पुस्तकाच्या पलीकडे आयुष्य काय असतं, आयुष्यामध्ये अनुभव किती महत्त्वाचे असतात हे यावेळी कळेल. एक दुसऱ्याच्या सहवासामध्ये ज्या चार गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्या निश्चित पद्धतीने आपल्याला भविष्य घडवण्यामध्ये फार महत्त्वाच्या ठरतात. महाराष्ट्र सरकार म्हणून या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चित पद्धतीने आपल्या मागे उभा आहे. असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
समाजाची खरी संपत्ती ही विद्यार्थी आहे. ही संपत्ती अधिक चांगल्या रीतीने वाढली पाहिजे, घडली पाहिजे. यासाठी जेवढी गुंतवणूक करू,ह्यांना जेवढा आपण आकार देऊ तेवढा आपल्या जिल्हा प्रगतीच्या दिशेने जाणार आहे.माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शिक्षणाला नेहमी महत्त्व दिलेले आहे आणि दर्जेदार शिक्षण आपल्या इकडच्या मुलांना कसं भेटेल यासाठी प्रयत्न केले. आपल्या इकडची मुलं इंजिनिअर,डॉक्टर,पायलट कशी बनतील त्यांच्याही आयुष्यामध्ये मुंबई पुन्हा नाशिक सारखे स्वप्न बघण्याची संधी त्यांना कशी भेटेल. यासाठी राणेसाहेबांनी प्रयत्न केले आपण सुद्धा असेच प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भावी पिढीच्या उत्कर्षासाठी करत राहू असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी आपले विचार मांडले.”