बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ.नाथ पै यांचा स्मृतिदिन व संस्थेचा वर्धापनदिन साजरा
सामान्य कुटूंबात जन्मलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. बॅ.नाथ पै यांच्यामुळे सिधुदुर्गचे नाव देशभर पोहोचले आहे. इतक्या वर्षांनंतरही आज समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची नात आदिती पै यांनी लिहिलेल्या बॅ.नाथ पै या पुस्तकात नाथ पै यांची जीवनगाथा त्यांनी केलेला संघर्ष मांडला आहे. यातून तरुण पिढीला त्यांचा आदर्श घेता येईल.हे पुस्तक तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
बॅ.नाथ पै शैक्षणिक संस्थेतर्फे बॅ.नाथ पै यांचा ५० वा स्मृतिदिन आणि संस्थेचा १८ वा वर्धापन दिन कुडाळ येथे संस्थेच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक बोलत होते.ते पुढे म्हणाले नाथ पै यांच्या पश्चात त्यांच्या अमोघ वाणीचे, जनसामान्यांसाठी त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याचे आजही स्मरण केले जाते. त्यांच्या विचारांचे आपण जतन करूया. त्यांचे विचार जतन करण्याचे कार्य बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी करत आहेत त्यांना आपण बळ देऊया. असे आ. वैभव नाईक यांनी सांगत नाथ पै यांना श्रद्धांजली अर्पण केली व शिक्षण संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व बॅ.नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदिती पै यांनी लिहिलेले पुस्तक आ. वैभव नाईक भेट देण्यात आले.
याप्रसंगी बॅरिस्टर नाथ पै यांच्या नात आदिती पै व कुटुंबातील मंडळी-शैलेश पै,अद्वैत पै, मीना पै ,कमलताई परुळेकर, ॲड. देवदत्त परूळेकर, मंगल परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब ,अमरसेन सावंत, विकास कुडाळकर सुधाकर तांडेल, जयप्रकाश चमणकर ,दीपक नाईक ,संजय वेतुरेकर, चेअरमन उमेश गाळवणकर ,अरुण मर्गज, परेश धावडे ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत, संस्थेचे सल्लागार डॉ. व्यंकटेश भंडारी, पियुषा तेंडुलकर, पल्लवी कामत, यांच्यासहित विविध अभ्यासक्रमांचे प्राचार्य शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.