*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन-रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शांतता शिकवते काही*
शांतता शिकवते मला
मौनातही बोलायला
न बोलल्या शब्दांचाही
अर्थ उमगुन घ्यायला
शांतता शिकवते मला
अंतरात शोधायला
गूढ काय आत दडले
जरा जाणूनी घ्यायला
शांतता शिकवते मला
हृदय-स्पंदने ऐकायला
तार तेव्हा या हृदयीची
त्या हृदयी जुळवायला
शांतता शिकवते मला
स्थितप्रज्ञ रहायला
सुखे:दुखे समेकृत्वा
आचरणात आणायला
शांतता शिकवते मला
विसंवाद टाळायला
बाजू दुसऱ्याची जाणून
सुसंवाद साधायला
शांतता शिकवते मला
निसर्गसंगीत ऐकायला
दैवी आनंदाची अनुभुती
मनापासून अनुभवायला
शांतता शिकवते मला
समरसून जगायला
इतरांसाठी जगताना
स्वतःवर प्रेम करायला
पण….. शांतता…
कधीतरीच हवीहवीशी,
माणसांमध्ये रमायला
अजूनही बरंच काही
शांतता शिकवते मला
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन