कुडाळ नगरपंचायतच्या अध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारी रोजी
कुडाळ
कुडाळ नगरपंचायतच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी होणार असून याचा निवडणूक कार्यक्रम आज, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. यानुसार, २० जानेवारी २०२५ दुपारी २ वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र सादर करावे लागणार आहे.
तसेच २० जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत संपल्यानंतर पिठासीन अधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्राची छाननी होईल.
तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पदाची छाननी झाल्यानंतर पीठासीन अधिकारी यांच्यामार्फत नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व ती फेटाळण्याची कारणे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील. नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची अपील दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतरच्या पुढील दिवशी म्हणजे २३ जानेवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचे वेळ असेल. तर २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेच्या सुरुवातीला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करण्यात येतील. त्यांनतर २४ जानेवारी २०२५ रोजी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान व पिठासीन अधिकाऱ्यांमार्फत निकाल घोषित करण्यात येईल.