सर्व श्री सुरेश भट. उद्धव ज. शेळके. प्रा. मधुकर केचे प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर शरदचंद्र सिन्हा बाबा मोहोड उषाताई चौधरी सुधाकर देशमुख आणि सुदाम सावरकर ही अमरावती शहरातील नामवंत लेखक व कवी मंडळी. या सर्वांशी माझे अतिशय निकटचे संबंध होते .त्यातल्या त्यात प्रा. मधुकर केचे आणि मी एकाच महाविद्यालयांमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. त्या महाविद्यालयाचे नाव म्हणजे अमरावतीच्या मोर्शी रोडवर असलेले श्रीमती केशरबाई लहोटी महाविद्यालय. माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे याच महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आम्ही महाविद्यालयाच्या परिसरातच राहत होतो. त्यामुळे महाविद्यालय आणि मी हे समीकरण बरेच वर्षे चालले. याच महाविद्यालयामध्ये मधुकर केचे हे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना लिहिण्याची भाषणाची आवड होती. त्यांचा माझा परिचय विद्यार्थी दशेपासूनच .ते आणि प्रा.ब्रिजमोहन हेडा हे आम्हाला मराठी शिकवायचे. मधुकर केचे सरांची शिकविण्याची शैली असामान्य होते. ते सतत दौऱ्यावर राहायचे .साहित्य संमेलन नाट्य महोत्सवाचे परीक्षक शिवाय अनेक ठिकाणी ते निमंत्रित कवी वक्ते म्हणून जायचे .शिवाय विद्यापीठाच्या विविध समितीवर असायचे. त्यांच्या तासामध्ये आम्ही तल्लीन होऊन जायचे.
पुढे माझे वडील सेवेत असताना मृत्युमुखी पडले आणि मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून श्रीमती केशरबाई महाविद्यालयात रुजू झालो. आता तर सरांशी रोजच संपर्क व्हायला लागला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यावरही मी मराठी व इंग्रजी टंकलेखन शिकून घेतले. त्याचा मला फायदा असा झाला की मधुकर केचे सरांनी मला माझा लेखनिक म्हणून नियुक्त केले. माझे लाहोटी महाविद्यालयामध्ये काम साधारणपणे दुपारी एक दोन वाजेपर्यंत संपून जायचे. सर सकाळच्या शिफ्टमध्ये होते. ते बारा वाजताच मोकळे व्हायचे. मी साधारणपणे दोन वाजता त्यांच्याकडे जायचा. त्यांचे डिक्टेशन सुरू व्हायचे आणि मग मी ते टंकलिखित करायचा. सरांचा लेखनिक होण्याचा एक फायदा झाला. माझी मराठी चांगली झाली. शुद्धलेखन चांगले झाले. त्याचाच परिणाम की काय मी एम ए मराठी च्या परीक्षेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ड्युटी करून नागपूर विद्यापीठातून पहिला आलो. एखादा शब्द चुकला की सर खूपच रागवायचे. मला पण राग यायचा. पण मी तर गळून टाकायचा. त्याचा असा फायदा झाला की आज मी लेखन करीत असताना माझ्याकडून सहसा एकही चूक होत नाही.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. गं . बा. सरदार हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाचे सरांना निमंत्रण होते. मला व बबन सराडकर यांना या संमेलनाला जायचे होते. बबनची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मला मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून 210 रुपये पगार मिळत होता. शिवाय घरचा सगळा भार माझ्यावरच होता. मी केचे सरांजवळ माझी इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले मी संमेलनाला जाण्यासाठी तुला 25 रुपये उसने देतो. तू पाच रुपये महिना मला परत करायचे. मी लगेच बबन सराडकरला कळवले. जाण्या येण्याची तर व्यवस्था झाली. पण तिथे जेवणासाठी व राहण्यासाठी प्रतिनिधी शुल्क भरावे लागत होते. पण त्यावेळेस आमचे पत्रकार मित्र मदतीला आले. त्यांनी आम्हाला पत्रकार असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि आमचा मार्ग सोयीस्कर झाला. बार्शीला केचे सरांनी माझी व बबन सराडकरची खूप साहित्यिकांशी ओळख करून दिली.
केचेसरांच्या सहवासात श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात तसेच त्यांचा लेखनिक म्हणून काम करीत असताना त्यांना अतिशय जवळून पाहण्याचा त्याच्या समजून घेण्याचा योग मला आला. त्यातून मी हे टिपले की त्यांचे लेखन एक टाकी होते. मला डिक्टेशन देताना त्यांनी कधीही हा शब्द असा नाही असा पाहिजे असे म्हटले नाही. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होती हे मला जाणवत होते. मी लेखनिक म्हणून येण्यापूर्वी सर हाताने लिहायचे. महाविद्यालयामधील पाठ कोरे कागद वापरायचे. त्यांनी कधी स्वतःचा लेटर पॅड छापला नाही किंवा शिक्का पण बनवला नाही. पण लेखनाच्या बाबतीत ते तरबेज होते. आसवांचा ठेवा. पुनवेचा थेंब आणि दिंडी गेली पुढे या त्यांच्या तीन कवितासंग्रहांना लागोपाठ तीन वर्ष महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार मिळाले. लागोपाठ महाराष्ट्र राज्याचा राज्य पुरस्कार मिळालेले ते महाराष्ट्रातील एकमेव कवी आहेत. केचे सरांना जे पटले तेच त्यांनी लिहिले. उगीच आपले भारुड वाढवले नाही.जे जीवन ते जगत होते तेच ते लिहीत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला जिवंतपणा येत होता. लिखाणाशी त्यांनी कधीही तळजोड केली नाही. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची शीर्षके ही सहा अक्षरांची आहेत. सहा अक्षरांवर त्यांचे नितांत प्रेम होते . आखर अंगण. झोपलेले गाव .चेहरे मोहरे.दिंडी गेली पुढे .पुनवेचा थेंब आसवांचा ठेवा ही सगळी सहा अक्षरी पुस्तके आहेत.
माझ्या वैयक्तिक जीवनामध्येही त्यांचे स्थान अमर आहे. मी एम ए झालो. विद्यापीठातून पहिला आलो. माझा पहिला इंटरव्हयू धामणगाव रेल्वे येथील धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श महाविद्यालयामध्ये होता. योगायोगाने केचेसर मुलाखत घ्यायला होते आणि सोबत विदर्भ महाविद्यालयाचे सरपटवार सर होते .ते दोघेही टॅक्सीने इंटरव्ह्यू घ्यायला जाणार होते. मला केचे सरांनी विचारले .तू कसा येणार आहेस. मी म्हटले बसने. ते म्हणाले तू माझ्या गाडीमध्ये चल. खरं म्हणजे ते नियमानुसार योग्य नाही .पण एक तर तू योग्य असा उमेदवार आहेस . शिवाय विद्यापीठात पहिला आला आहेस. शिवाय धामणगाव एज्युकेशन सोसायटी ही शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक आहे. आम्ही म्हटले आणि तुझा इंटरव्यू त्यांना रुचला नाही तर ते तुला घेणारही नाहीत. त्यामुळे तू आमच्याबरोबर यायला हरकत नाही. मुलाखत झाली. तेव्हाचे अध्यक्ष श्री अग्रवाल आणि अलसीदासजी राठी हे सचिव होते. केचे सर आणि सरपटवारसर यांनी माझी शिफारस केली .माझ्या एवढा शैक्षणिक व साहित्यिक उंची असलेला उमेदवार दुसरा कुणी नव्हता. त्यामुळे माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सर मला अध्यक्षांच्या घरी जेवण करायला घेऊन गेले. किती हा जिव्हाळा. आणि किती हे प्रेम.
मुक्ता वहिनी आमच्या भोजनाची व्यवस्था करायच्या. त्या अमरावतीच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये अध्यापिका होत्या. अनेक वेळा मी त्यांच्याकडे जेवण केले आहे. मुक्तावहिनी आणि सर मला जेवण करायचा आग्रह करायचे. मलाही गरजेचे होते. कारण की मी तेव्हा तपोवनात राहत होतो. आणि माझ्याजवळ फक्त सायकल होती.सतेज सौरभ शार्दुल ही सरांची मुले. मी सरांचा चौथा मानसपुत्र.
सरांनी कधी स्कूटर मोटरसायकल कार वापरली नाही. सायकलचा वापर ते कौशल्याने करायचे. ते सायकलवर फारच कमी बसायचे. सायकल हातात घेऊन कॉलेजपर्यंत पायी जायचे आणि कॉलेजमधून राठी नगरातल्या घरी जाईपर्यंत सायकल हातात घेऊनच परत जायचे. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले आपण जर पायी पायी गेलो तर लोक लिफ्ट देतील. त्यापेक्षा सायकल हातात दिसली म्हणजे कोणी लिफ्ट देत नाही आणि माझेपण फिरणे होते.
डॉक्टर मोतीलाल राठी आणि मधुकर केचे यांचे ऋणानुबंध खूपच जवळचे होते. केचेसर राठीसाहेबांना म्हणायचे .तुमचे नाव राठी नाही .मराठी असायला पाहिजे होते. माझा पहिला कवितासंग्रह 1976 या वर्षाला अमरावतीच्या नगर वाचनालयमध्ये प्रसिद्ध झाला. त्याला त्याचे सरांची सोळा पानांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. या कवितासंग्रहाला मुखपृष्ठ सुप्रसिद्ध साहित्यिक कवी व लेखक प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे मुखपृष्ठ आहे. आणि जो प्रकाशन समारंभ झाला त्या प्रकाशन समारंभ निमित्त झालेल्या कवी संमेलनाचे संचालन मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. प्रभा गणोरकर यांनी केले आहे. हे सगळे घडून येण्यामध्ये केचे सरांचा महत्त्वाचा वाटा आहे.
मी आणि सर कॉलेजमध्ये तसेच घरी सोबतच असायचे. माझे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात नियुक्ती झाली पण शासन मान्यतेचीअडचण येत होती. तेव्हा शिक्षणमंत्री श्री सुधाकरराव नाईक होते. सुधाकरराव नाईक व मधुकर केचे हे वर्गमित्र. सरांनी माझ्यासाठी श्री सुधाकरराव नाईक यांच्याजवळ शब्द टाकला आणि तिकडे सुरेश भटांनी श्री रा.सू.गवई यांना विनंती केली .या दोघांचा तत्कालीन राजकारणी लोकांवर इतका प्रभाव होता की प्रचंड विरोध असतानाही मला शासन मान्यता मिळाली.
केचे सरांना कॅन्सरचे निदान झाले तेव्हा मुंबईला त्यांच्याबरोबर कोण जाणार ? तर त्यामध्ये मी व बबन सराडकर यांचे नाव पुढे आले. सरांनी सांगितले तुमच्या बॅगा भरून ठेवा. तुम्हाला केव्हाही माझ्याबरोबर मुंबईला यावे लागेल. इतके त्यांचे आमच्यावर प्रेम होते.
25 मार्चचा तो दिवस. माझे मित्र श्री अरुण बद्रे हे माझ्या तपोवन येथील माझ्या घरी आले. तेव्हा फोनच नव्हते. मला म्हणाले सर वारले. खूप दुःख वाटले. एक जीवाभावाचा आपल्यावर प्रेम करणारा आपल्यावर आधार देणारा आधारवड कायमचा आमच्यातून निघून गेला होता. प्रामाणिकपणे लिहिणारा आपल्या भाषणातून लोकांना हसविणारा एक अष्टपैलू प्राध्यापक लेखक कवी वक्ता हे जग सोडून निघून गेला पण अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती या न्यायाने ते मान्य करावे लागेल. सरांनी जे भरपूर लेखन केलेले आहे ते आजही आपल्यासमोर आहे. त्यांचे लेखन म्हणजे विदर्भाचा चालता बोलता इतिहास आहे असे विधान केल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003

