You are currently viewing रत्नागिरी येथे प्रथमच १८ व १९ जानेवारीला अखिल मराठा समाजाचे महासंमेलन

रत्नागिरी येथे प्रथमच १८ व १९ जानेवारीला अखिल मराठा समाजाचे महासंमेलन

अनेक मान्यवरांची उपस्थिती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नारायण राणे यांचा ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्काराने होणार सन्मान

रत्नागिरी :

महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठा मंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केले आहे.या संमेलनात खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ‘दि ग्रेट मराठा’ हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, अशी माहिती मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राकेश नलावडे, अप्पा देसाई, प्राची शिंदे उपस्थित होत्या.

याविषयी अधिक माहिती देताना श्री. सुर्वे म्हणाले, रत्नागिरी येथील महासंमेलन हे दोन दिवसांचे असून त्याचे उद्घाटन १८ रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपतींचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते आणि खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच याप्रसंगी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील नवनिर्वाचित मराठा आमदार नीलेश राणे, शेखर निकम, भास्कर जाधव, निरंजन डावखरे, नूतन मंत्री नितेश राणे, योगेश कदम यांचा मराठा समाजातर्फे भव्य सत्कार केला जाणार आहे. या महासंमेलनासाठी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव व सारथीचे विद्यमान अध्यक्ष अजितराव निंबाळकर आणि कर्नाटक राज्याचे मुख्य सचिवपद भुषविलेले अविनाश जाधव हे दोन्ही मराठा समाजातील वरिष्ठ आयएस अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या महासंमेलनात ज्या मराठा मान्यवरांनी त्यांच्या कार्यसिद्धीमुळे नाव कमावलेले आहे अशा नामवंतांचा फेडरेशनचे मानाचे पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा