देवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई
देवगड:
देवगडच्या समुद्रकिनारी दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३२ वाजता 16°20.947N 73°09.812E या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी, श्री. मुरारी भालेकर (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, मालवण), नियमित गस्त घालत असताना, महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात परवाना असलेल्या चांदणी १ (नोंदणी क्रमांक IND-MH-५-MM-७५८) या नौकेवर एल.ई.डी. लाईटद्वारे अनधिकृत मासेमारी करताना पकडले.
सदर नौकेवर नौका तांडेलसह दोन खलाशी होते. नौका ताब्यात घेऊन सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली असून, नौकेवर मासळी आढळून आलेली नाही. नौकेवर असलेल्या एल.ई.डी. लाईट व संबंधित उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
जप्त करण्यात आलेल्या सामग्रीत सुमारे १० ते १२ लाख रुपये किंमतीचे लाईट, जनरेटर आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे.
ही कारवाई अंमलबजावणी अधिकारी श्री. मुरारी भालेकर यांनी पोलिस कर्मचारी श्री. संकेत तांडेल, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दिपेश मायबा आणि सागर परब यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.
अंमलबजावणी अधिकारी श्री. भालेकर यांनी सविस्तर प्रतिवेदन दाखल केले असून, याप्रकरणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.