भांडुप :
शालेय जीवनापासून खो खो खेळासाठी मिळालेल्या प्रोत्साहनामुळे भांडुप येथील सह्याद्री विद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत चेंदवणकर याची आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खो खो संघात निवड झाली आहे. सिंधुदुर्गवासीय असलेल्या २२ वर्षीय अनिकेतचे शिक्षण भांडुप येथेच झाले. गेली दहा वर्षे तो सह्याद्री खो खो संघाच्या माध्यमातून तो प्रशांत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खो खो चे प्रशिक्षण घेत आहे.
शालेय स्तरावर सह्याद्री विद्यालयात खोखो चे प्रशिक्षण दिले जात होते, त्यामुळेच अनिकेत याला खोखो मध्ये रुची निर्माण झाली. अखेर खोखो हेच पॅशन बनविलेल्या अनिकेतने शिक्षण पूर्ण झाल्यावर ठाणे येथील सरस्वती विद्यामंदिर मध्ये क्रीडा प्रशिक्षकाची नोकरी स्वीकारली. परंतु स्वतःचे खो खो प्रशिक्षण मात्र सुरूच ठेवले होते. रोज सायंकाळी सह्याद्री विद्यालयाच्या पटांगणावर सहकाऱ्यांसमवेत तो खोखो चे प्रशिक्षण घेत असे. अनेक स्पर्धांमध्ये देखील सहभागी होत असे. उत्कृष्ट संरक्षक म्हणून त्याला पारितोषिके देखील मिळाली आहेत. त्याचे खेळातील सातत्य आणि आवड पाहता त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
उत्तराखंड येथे २८ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी या काळात हो राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार असून अनिकेत या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १० जानेवारी पासून पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देखील तो नक्कीच यशस्वी होईल अशा सदिच्छा भांडुपवासियांनी दिल्या आहेत.