You are currently viewing पावशीतील राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत मलकापूरच्या महिपती पाटील यांचा बैलगाडा विजयी

पावशीतील राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत मलकापूरच्या महिपती पाटील यांचा बैलगाडा विजयी

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पावशी येथील अभिषेक चंद्रकांत वाटवे मित्रमंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीमध्ये मलकापूर – कोल्हापूर येथील महिपती पाटील यांच्या बैलगाडाने बाजी मारली आणि सिंधुदूर्ग केसरी २०२५ वर आपले नाव कोरले. या शर्यतीत एकूण ५६ बैलगाडा सहभागी झाले होते. या शर्यतीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जवळपास दहा हजार प्रेक्षकांनी या शर्यतीचा आनंद लुटला. या मंडळाच्या वतीने शर्यतीचे हे चौथे वर्ष होते. पावशी – मिटक्याचीवाडी येथील मैदानावर सदर शर्यतीला बैलगाडा मालक तसेच हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी या शर्यतीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या शर्यतीचे उद्घाटन पावशी येथील बैलप्रेमी व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वाटवे, डॉ जी.टी. राणे, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दयानंद चव्हाण, आपा परब, बाळू सामंत, अभिषेक वाटवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही सर्वात मोठी व प्रतिष्ठेची बैलगाडा शर्यत आहे. या शर्यतीची उत्सुकता बैलगाडा मालकांना असते आणि ते या शर्यतीत आपला बैलगाडा उतरवितात. यावर्षी सिंधुदूर्गसह कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, चिपळूण, सातारा, आजरा आदी भागांतून एकूण ५६ बैलगाडा या शर्यतीत सहभागी झाले होते. या शर्यतीत अव्वल दर्जाचे बैलगाडा सहभागी झाल्याने प्रेक्षकांमध्येही उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सिंधुदुर्ग केसरी २०२५ कोण पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मलकापूर – कोल्हापूरच्या महिपती पाटील यांच्या बैलगाडाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली. उर्वरित निकाल पुढील प्रमाणे आहे. द्वितीय सुरेश भोसले (चेरवली- रत्नागिरी) तृतीय नितीन देसाई (पाली – रत्नागिरी), चौथा स्वराज गुरव (आरवली – संगमेश्वर), पाचवा – आनंदा पाटील (उजत – कोल्हापूर) सहावा – रमेश पावसकर (लांजा – रत्नागिरी), सातवा – अरुण कानडे (लांजा – रत्नागिरी), आठवा – अभिनव राणे (कणकवली – सिंधुदुर्ग), नववा – प्रकाश आंब्रे (आंबा – कोल्हापूर) व दहावा – वेदांत बागवे (कुंदे – कुडाळ ) या मालकांच्या बैलगाडाने मिळविला. विजेत्यांना ढाल व रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानण्यात आले. या शर्यतीसाठी श्री.अभिषेक वाटवे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन केले होते. या मंडळाचे अवधूत राणे, जयेश चव्हाण, किसन राणे, ऋषीं घाडी, मिलिंद राणे, मयूर राणे, समीर राणे, जयेश घोगळे, काका साटेलकर, सुजित पाटकर, राकेश पाताडे, विकास राणे यांच्या अथक प्रयत्नानी व सहकार्यामुळे सदर शर्यत यशस्वीरीत्या पार पडली. सिंधुदुर्गसह राज्यातील विविध भागातून तसेच बेळगाव, गोवा येथून या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने संख्येने आलेल्या प्रेक्षकांचे आयोजक मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा