You are currently viewing शेतकऱ्यांबरोबरच जिल्हा विकासाचा केंद्रबिंदू जिल्हा बँक ठरेल – अध्यक्ष मनीष दळवी

शेतकऱ्यांबरोबरच जिल्हा विकासाचा केंद्रबिंदू जिल्हा बँक ठरेल – अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तृतीय वर्षपुर्तीनिमित्त प्लॅटिनम कार्ड सुविधेचा शुभारंभ

ओरोस :

जिल्हा बँक प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे. त्याच बरोबर युवा वर्ग, महिला, शिक्षण यासाठीही बँक कार्यरत आहे. बँकेकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. विकासाला बँकेने प्रमुख माध्यम ठरवले असले तरी ही बँक जिल्ह्याच्या सामाजिक विकासाचे केंद्र बनावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी प्लॅटिनम रुपे डेबिट कार्ड या अत्याधुनिक सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक रवींद्र मडगावकर, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, निता राणे, विठ्ठल देसाई, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग बँकेचे विद्यमान संचालक मंडळाने दि. १२ जानेवारी २०२५ रोजी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पुर्ण केलेला आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार मान. नारायण राणे तसेच महाराष्ट्र राज्याचे मत्य व बंदर विकास मंत्री मान. ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये मागील केवळ तीन वर्षाच्या कालावधीत बँकेने सर्वांगीण प्रगती साधलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच आर्थिक स्तरातील ग्राहकांसाठी त्यांच्या गरजा ओळखुन काळानुरुप अंमलात आणलेल्या विविध ठेव, कर्जे इत्यादी ग्राहकाभिमुख योजनांमुळे सामाजिक बांधिलकी जपत बँकेनेही प्रगती साधत आपली आर्थिक स्थिती मजबुत केलेली आहे. आजच्या तांत्रिक युगाची गरज ओळखुन बँकेने त्या त्या वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे जिल्हयातील राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका यांच्याबरोबर स्पर्धेत उतरत डिजीटल बँकिंगसह सर्वच बाबतीत अगदी राज्यस्तरावर आघाडीवर रहाण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक यशस्वी झालेली आहे. शिस्त, कामाचे काटेकोर नियोजन व तितकीच काटेकोर अंमलबजावणीची सुत्रे बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी अंमलात आणल्यामुळे हे यश प्राप्त झाले असून संचालक मंडळाच्या तृतीय वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष मा. मनिष दळवी यांनी बँकेच्या मागील तीन वर्षाच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

बँकेची आर्थिक स्थिती (रक्कम रू. कोटीत)

अ.क्र. आर्थिक वर्ष (अखेर) भाग भांडवल एकूण निधी एकूण ठेवी एकूण कर्जे एकूण व्यवसाय ढोबळ नफा निव्वळ नफा ऑडिट वर्ग
१. ०१/०७/१९८३ ०.३८ ०.७६ ६.३२ ३.६९ १०.०१ – ०.०८ –
२. ३१/१२/२०२१ ४४.७० २३४.७२ २२६३.३१ २०१४.३६ ४२७७.६७ २७.०६ – –
३. ३१/०३/२०२४ ४९.९४ ४३४.४२ २९७२.७९ २४१८.१० ५३९०.८९ १००.५९ २६.०० ‘अ’
४. ३१/१२/२०२४ ५२.५९ ४५५.३२ ३१५२.४३ २८७२.६६ ६०२५.०९ ५८.५० – –
एकूण वाढ (डिसेंबर २१ ते डिसेंबर २४) ७.८९ २२०.६० ८८९.१२ ८५८.३० १७४७.४२ ३१.४४ – –

बँकेच्या स्थापनेच्या वेळी ३६८ सभासद संख्या व २६ शाखांच्या माध्यमातून १० कोटींचा व्यवसाय असणारी बँक आज १०५५ सभासद, ९८ शाखा व ४२ ए.टी.एम्. सेंटरच्या माध्यमातून रु. ६०२५ कोटीच्या व्यवसायापर्यंत पोचली आहे. या प्रगतीला नुतन संचालक मंडळाने घेतलेले दुरदर्शी निर्णय व कार्यपद्धतीसुद्धा कारणीभूत असून ही प्रगती साधण्यात विद्यमान संचालक नेतृत्व यशस्वी झाले आहे.

बँकेचे एकूण भाग भांडवल व एकूण निधी*

भाग भांडवल हे कोणत्याही सहकारी संस्थेचा पाया असतो. त्या दृष्टीने बँकेने भाग भांडवल वाढीस बँकेने नेहमीच प्राधान्य दिलेले असून मागील तीन वर्षाच्या कालावधीत बँकेच्या भाग भांडवलामध्ये रु.७.८९ कोटी एवढी वाढ होऊन बँकेचे एकूण भागभांडवल दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेर रु. ५२.५९ कोटी एवढे झालेले आहे.

आर्थिक स्थैर्य व सुदृढतेच्या दृष्टीने बँकेच्या स्वनिधीमध्ये वाढ व्हावी या दृष्टीने बँकेने वेळोवेळीच्या नफ्यामधून गंगाजळी व इतर निधीमध्ये वाढ केलेली आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत बँकेच्या एकूण निधीमध्ये रु.२२०.६० कोटी एवढी वाढ होऊन बँकेचे एकूण निधी दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेर रु.४५५.३२ कोटी एवढे झालेले आहेत.

*बँकेच्या एकूण ठेवी रू. ३००० कोटींच्यावर*

बँकेवरील ठेवीदार, ग्राहकांचा असलेला दृढविश्वास, बँकेची उत्तम ग्राहकसेवा व बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या आधुनिक बँकीग सुविधा यामुळे बँकेच्या ठेवींमध्ये उत्तरोतर वाढ होत आहे. बँकेच्या डिसेंबर २०२१ पर्यतच्या ३८ वर्षाच्या कालावधीत बँकेच्या ठेवीमध्ये रु.२२५६.९९ कोटी एवढी वाढ झालेली होती. मात्र बँकेने चालु वर्षी रु. ३००० कोटींचा ठेवींचा टप्पा पार करत मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ठेवींमध्ये रु. ८८९.१२ कोटी एवढी मोठी ठेववाढ करुन बँकेच्या एकूण ठेवी रु. ३१५२.४३ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. पुढील उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत बँक आपल्या रू. ३५०० कोटीच्या वार्षिक ठेवींचा टप्पा नक्कीच गाठेल असा विश्वास असून त्यादृष्टीने बँकेचे नियोजन आहे.

*बँकेच्या कर्जव्यवहारामधील वाढ*

त्रिस्तरीय पतयंत्रणेमधील राज्य बँक व शेती संस्था यामधील महत्त्वाचा मधला दुवा म्हणून जिल्हा बँक कार्य करीत असते. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती त्यानुसार जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांसाठी कर्ज पुरवठा करण्यामध्ये बँक नेहमीच अग्रेसर राहीली आहे. शेती कर्जाबरोबरच जिल्ह्यातील शेती पुरक व्यवसाय, स्वयंरोजगार, ग्रामीण कारागीर, नवउद्योजक, महिला, गृहिणी इत्यादि सर्व घटकांना कर्जपुरवठा करण्यात येत असल्याने बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये नियमितपणे वाढ होत आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेच्या कर्जव्यवहारामध्ये रु. ८५८.३० कोटी एवढी वाढ होऊन बँकेचे एकूण कर्जे रु. २८७२.६६ कोटी एवढे झालेले आहे.

एकूण व्यवसायाचा रू. ६००० कोटींचा टप्पा पार

स्थापनेच्या वेळी बँकेचा एकूण व्यवसाय रु. १०.०१ कोटी एवढा होता. तो दि. ३१/१२/२०२१ अखेरपर्यंतच्या अडतीस वर्षाच्या कालावधीत रु. ४२६७.६६ ने वाढून रु. ४२७७.६७ एवढा झालेला होता. मागील तीन वर्षाच्या कालावधीत एकूण व्यवसायामध्ये रू. १७४७.४२ कोटी एवढी वाढ होऊन एकूण व्यवसाय रु. ६०२५.०९ कोटी एवढा झालेला आहे. बँकेने ३१ मार्च २०२५ अखेर एकूण व्यवसायाचे रु. ६००० कोटीचे उद्दीष्ट निर्धारीत केलेले होते. बँकेने सदर उद्दीष्ट नऊ महिन्यामध्येच म्हणजेच डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण केलेले असून रु. ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा तीन महिन्यापुर्वीच पार केलेला आहे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.

*ढोबळ व निव्वळ नफा*

दि. ३१/०३/२०२२ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू. ७२.८६ कोटी एवढा होता, केवळ दोन आर्थिक वर्षांमध्ये त्यामध्ये रू. २७.४० कोटीने वाढ होऊन दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू. १००.२६ कोटी एवढा झालेला आहे. बँकेच्या इतिहासात मागील दि. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा पहिल्यांदाच रू. १०० कोटीच्या वर ढोबळ नफा गेलेला आहे. बँकेचा निव्वळ नफा दि. ३१/०३/२०२२ अखेर रू. १६.०० कोटी होता. त्यामध्ये रू. १०.०० कोटीने भरीव वाढ होऊन दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेचा निव्वळ नफा रू. २६.०० कोटी एवढा झाला आहे.
चालु आर्थिक वर्षामध्ये माहे डिसेंबर २०२४ अखेर बँकेस रू. ५८.५० कोटी एवढा ढोबळ नफा झालेला असून मागील वर्षीच्या डिसेंबर २०२३ च्या तुलनेत ढोबळ नफा रू. १७.५५ कोटीने जास्त आहे.

*ढोबळ व निव्वळ एन.पी.ए.*

बँकेकडे ढोबळ एन.पी.ए. चे आदर्श प्रमाण ५% च्या आत असणे आवश्यक असते. बँकेचे ढोबळ एन.पी.ए. प्रमाण दि.३१/०३/२०२२ अखेर ४.७३% एवढे होते. त्यामध्ये लक्षणीय घट होऊन हे प्रमाण दि.३१/०३/२०२४ अखेर ३.५२% एवढे झालेले आहे, तर बँकेने निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण (Net NPA %) सातत्याने ०.००% राखले आहे.

भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) 

बँकींग क्षेत्रामध्ये बँकांची आर्थिक सुदृढता ही भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्या (CRAR) आधारे निश्चित होत असतो व हे मानक प्रमाण कमीत कमी ९% असणे आवश्यक आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्तता प्रमाणामध्ये यामध्ये सातत्याने वाढ होत असून दि. ३१/०३/२०२४ अखेर बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) ११.०५% एवढे आहे.

ऑडिट वर्ग

कोणत्याही संस्थेच्या एकंदरीत वार्षिक कामगिरीचे मुल्यमापन म्हणजे त्या संस्थेस लेखा परिक्षणामध्ये मिळणारा ऑडीट वर्ग असतो. बँकेस आर्थिक निकषांच्या आधारे लेखापरिक्षणामध्ये दरवर्षी सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे. त्यामधुन बँकेची गुणवत्तापुर्ण नियमित वाटचाल अधोरेखित होत आहे.

इतर कामगिरी

शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन, पोल्ट्रीफार्म, पशुधन, वराह पालन, बायोगॅस, गोठा बांधणी, पडीक जमीनीवर लागवड करून लागवडीखाली आणणेसाठी स्वतंत्र कर्ज योजना, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजनांमध्ये आधुनिकता आणून इथला शेतकरी सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.

*महिला विकासासाठी प्रयत्न*

बँकेकडे असलेल्या महिला विकास कक्षामध्ये आधुनिकता आणून जिल्ह्यातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील महिलांसाठी अबोली ॲटो (पिंक ॲटो) कर्ज योजना अंमलात आणली तसेच स्वयंसहाय्यता बचतगटांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. महिलांसाठी नियमित कर्ज व्याजदरापेक्षा १ टक्के कमी व्याजदराची सुवर्णलक्ष्मी सोने तारण कर्जयोजना राबविली जात आहे.

*बँक सखी*

बँक सखी ही संकल्पना प्रथमच बँकेत राबवून बँक व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नवीन वाटचाल सुरू केली असून यामध्ये जिल्ह्यातील महिलांमधून सख्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना बँकेच्या महिला कक्षाद्वारे बँकींग संबंधीचे प्रशिक्षण देणेत आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकींग व्यवसायाबद्दलची माहितीचा प्रसार होणेस मदत होणार आहे तसेच शासनाच्या आर्थिक समावेशीकरणाबाबतची संकल्पना प्रत्यक्षात आणणेस मदत होईल.

*सिंधु उद्योग सहयोग कक्ष*

शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने प्र.का. स्तरावर ‘सिंधु उद्योग सहयोग कक्ष’ स्थापन केला. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यातील होतकरू नवउद्योजकांना माहिती मिळून त्यासंदर्भातील कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणेस मदत होते. तत्कालीन केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब यांच्या सहकार्यातून PMEGP, CMEGP, PMFME योजना प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या रूपाने सर्व जिल्हा बँकांना राबविण्यासाठी पात्र ठरविण्यात आले.

*बँकेचे ISO मानांकीत स्वत:चे डाटा सेंटर*
बँकेचे स्वत:चे डाटा सेंटर असून सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने आवश्यक विविध निकषांचे पालन केल्यामुळे मा.अध्यक्ष महोदय यांच्या कालावधीत दि.०९/१२/२०२३ रोजी बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे नामांकन प्राप्त झाले असून बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ISO मानांकनामुळे सिंधुदुर्ग बँकेचा बँकिंग क्षेत्रात नावलौकिक वाढण्याबरोबरच बँकेला आवश्यक विविध डिजीटल सुविधांसाठीची परवानगी मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

*डिजीटल बँकींग सुविधा*

राष्ट्रीयीकृत / खाजगी बँकांच्या समकक्ष विविध आधुनिक डिजीटल बँकींग सुविधा बँकेमार्फत ग्राहकांना पुरविण्यात येत असून त्याद्वारे जिल्ह्यातील सर्व आर्थिक स्तरातील व वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी उत्तमोत्तम बँकींग सेवा उपलब्ध झालेली आहे. तसेच जिल्ह्यातील व्यापारी व छोटे व्यावसायिक क्यु.आर. कोडच्या माध्यमातून व्यवहार करीत असतात. त्यांना क्यु.आर.कोड वितरणाबाबत विशेष मोहीम राबवून सदर सेवा पुरविण्यात येत आहे.

*ग्रीन चॅनेल सुविधा*

बँकेच्या सर्व शाखांमधून मायक्रो एटीएम मशीनच्या माध्यमातून ग्रीन चॅनेल सुविधेद्वारे पेपरलेस आणि तत्पर बँकींग सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड वापरून कोणताही ग्राहक रक्कम काढू शकतात.

*डोअरस्टेप बँकींग सुविधा*
आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यवसाय व्यस्ततेमुळे शाखेत प्रत्यक्ष येऊ न शकणारा व्यापारी वर्ग यासाठी अल्पबचत प्रतिनिधीमार्फत मायक्रो एटीएम डोअरस्टेप बँकींग सुविधा तसेच दैनंदिन अल्पबचत कलेक्शन सुविधा सुरू करणेत आली आहे.

*बँकेच्या व्यवसाय विकास योजना*
सोशल मिडीया व मार्केटींग सेल उभारून बँकेच्या विविध ठेव / कर्ज योजना तसेच बँक देत असलेल्या डिजीटल सुविधा या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने Facebook, Instagram, Whatsapp, Twitter या सोशल मिडीयांच्या वापराचा अभिनव उपक्रम बँकेने यशस्वीपणे राबविला. बँकेची स्वत:ची वेबसाईट असून त्याचे अद्ययावतीकरण करून त्यामध्ये सिंधु बोट ही चॅट बोट सुविधा उपलब्ध केली आहे. जेणेकरून ग्राहकांच्या शंकाचे निरसन याद्वारे केले जाते.

*महाराष्ट्र शासनच्या मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना*
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतही बँकेने भाग घेतला असून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना याचा उपयोग होईल.

*सर्वोत्कृष्ट कोअर बँकींग पुरस्कार*

गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत बँकेला विविध पुरस्कार मिळाले असून हल्लीच Banking System Intelligence या जागतिक पातळीवरच्या बँकींग क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा Global Fintech Perspective अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट ‘कोर बँकींग सिस्टीम’ (Implementation) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार इन्फोसिसचे संचालक श्री.पारेख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

एकंदरीत बँकेची आर्थिक व तांत्रिकदृष्टया गुणवत्तापुर्वक प्रगती होत असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये या बँकेचा समावेश होतो ही विशेष बाब आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात मान. केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या आर्थिक प्रगतीने वेग घेतला. शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा बँक आता डिजिटल बँक म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा