You are currently viewing काॅलिटी कंट्रोलच्या सूचनांच्या पूर्ततेनंतर करुळ घाट रस्ता सुरु होईल

काॅलिटी कंट्रोलच्या सूचनांच्या पूर्ततेनंतर करुळ घाट रस्ता सुरु होईल

मंत्री ना. नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

येत्या काही दिवसात करुळ घाट रस्त्याची एकेरी वाहतूक सुरू करणार

 

कणकवली :

२८ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी, हायवेचे अधिकारी, पिडब्ल्यूडी, अधिकाऱ्यांनी करूळ गगनबावडा घाटरस्त्याची पाहणी केली होती. जोपर्यंत रस्त्याचे दर्जेदार काम होत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड राहणार नाही. याची खात्री झाल्यानंतर करूळ घाट खालून वर जाणारी एक लाईनची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक महत्वाची आहेच मात्र, अपघात होऊन जीवितहानी होऊ नये याची खबरदारी सुद्धा महत्वाची आहे. निवडणुकीत करूळ घाट रस्त्यावरून माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. विरोधकांच्या सकारात्मक टीकेचा फायदा जनतेला होत असल्यास आम्ही त्याचेही स्वागत करतो. विकास कामांमध्ये आम्हाला फॉर्च्यूनर किंवा इन्होव्हा ची गरज भासत नाही. तसेच तो रस्ता नागरिकांचा आहे भाजप पक्षाचा नाहीय, अशा शब्दात मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी विरोधकांना चिमटा काढला. कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. सभापती सुरेश सावंत उपस्थित होते.

मंत्री ना. नितेश राणे पुढे म्हणाले, करूळ घाट रस्त्याबाबत शून्य अपघात हे ध्येय असले पाहिजे. मी स्वतः क्वालिटी कंट्रोल खात्याला संपर्क साधून करूळ घाट रस्त्याच्या झालेल्या कामाचा रिपोर्ट मागवला आहे. त्या रिपोर्ट मधून रस्त्याचा दर्जा किंवा काही त्रुटी असल्यास समजतील. ९ जानेवारी रोजी हायवे अधिकारी संतोष शेलार यांनी करूळ घाट रस्त्याची पाहणी करून अहवाल दिला आहे. या अहवालातील निर्देशानुसार तीव्र वळणे आहेत, तिथे संरक्षक भिंती व आवश्यक उपाययोजना करणे, जिथे डोंगराकडील बाजू तोडण्यात आली आहे तेथील लूज मटेरियल बाजूला करावे, सुरक्षा अहवाल आल्यानंतरच करूळ घाट रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी झाल्यानंतर काही दिवसांतच करूळ गगनबावडा घाटमार्गात वैभववाडीतून गगनबावडाकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल, असे मत्सोद्योग मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

विरोधकांनी आंदोलनाच्या निमित्ताने वाहतुक सुरू करण्याचे प्रयोग करू नयेत. विरोधकांचेही जीव त्यांच्या कुटुंबियांना आणि आम्हाला महत्वाचे आहेत. कारण विरोधक असले तरच आम्हालाही काम करताना आनंद आहे. घाट रस्ता सुरू झाल्यावर आपण राजकीय गोष्टी बाजूला करून एका गाडीने शुभारंभ करण्यासाठी तेथे जाऊ, असा मिश्किल टोला देखील मंत्री ना. नितेश राणे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा