देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू
देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय
देवगड
देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जनतेला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी मोजणीचे काम सुरू असून लवकरच या प्रकल्पाची वस्तुस्थिती आणि अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.
कणकवली येथील विश्रामगृहावर देवगड-जामसंडेच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. कोर्ला सातंडी धरणावर आधारित नवीन योजना अस्तित्वात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी दिले गेले.
देवगड-जामसंडे नगरपंचायत सन १ एप्रिल २०१८ रोजी अन्नपूर्णा नदीवरील स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली होती. मात्र, ही योजना १२ किमी लांब दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीवर आधारित आहे. नदीतील खाऱ्या पाण्याचा प्रभाव, गंजलेली जलवाहिनी आणि मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे उन्हाळ्यात पाणी उपशासाठी अडथळे निर्माण होतात. परिणामी, देवगड-जामसंडे नगरपंचायतीला दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
सदर परिस्थितीचा विचार करून कोर्ला सातंडी धरणावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत कायमस्वरूपी आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
नामदार नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.