You are currently viewing युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

*युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शनिवार दि.११ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
महाविद्यालयातील करिअर कट्टा, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनाच्या निमित्ताने “तिमिरातूनी तेजाकडे” हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. त्यानंतर स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजित दिघे यांनी प्रास्ताविकात पाहुण्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि करिअर कट्टा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि “तिमिरातूनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रवर्तक श्री.सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवादक अधिकारी, सीमा शुल्क विभाग, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील विविध संधी, तयारीच्या पध्दती आणि आवश्यक कौशल्ये याविषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले आणि कोकणातील विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरमध्ये पुढे आले पाहिजे आणि वेळेचे नियोजन केले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री. विजय रावराणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांचा वापर करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त श्री. प्रभानंद रावराणे यांनी विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देऊन आयुष्य घडवावे असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन व्ही गवळी, संस्थेचे विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार व अधिक्षक श्री.संजय रावराणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस. एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. ए. भोसले यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा