You are currently viewing कणकवली महोत्सवास आजपासून प्रारंभ

कणकवली महोत्सवास आजपासून प्रारंभ

कणकवली महोत्सवास आजपासून प्रारंभ

मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन :

आज भव्य शोभायात्रा, सलमान अली म्युझिकल नाईट

कणकवली

कणकवली पर्यटन महोत्सवाचा भव्य शुभारंभ गुरुवार, ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर होणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. चे राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. भव्य शोभायात्रेने महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर फूड फेस्टिव्हलचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे प्रसिद्ध गायक सलमान अली याच्या वाद्यवृंदाचा पहिल्याच दिवशी कार्यक्रम होणार आहे. १२ जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा महोत्सव चालणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपतर्फे होणाऱ्या या महोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे बैनर्स लावण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन मार्गावर भव्य कमानी उभारण्यात आल्या असून विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. महोत्सवाच्या उ‌द्घाटनाला मंत्री राणे यांच्यासह कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मुख्य आयोजक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

गुरुवार, ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा शहरात पटकीदेवी मंदिर ते बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकातून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत शहरातील १७ प्रभागांचे तसेच प्रशालांमधील चित्ररथ असणार आहेत. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ६ वा. फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रात्री ८ वा. इंडियन आयडॉल सीझन १० चा विजेता सलमान अली आणि त्याच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे. याचदरम्यान महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा तसेच रिल्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १० जानेवारी रोजी सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक २५० कलाकारांच्या सहभागाने कनकसंध्या कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गाणी, नृत्य, स्किट आदी कार्यक्रम होणार आहेत.

११ जानेवारी रोजी इंडियन आयडॉल सीजन १३ चा विजेता रिशी सिंग, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे, नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे. रविवार, १२ जानेवारीला महोत्सवाचा समारोप आणि इंडियन आयडॉलचे गायक पवनदीप राजन व उपविजेती अरुणिता कांजीलाल तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. कार्यक्रमांचा जिल्हयातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा