एचएमपीव्ही संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना
सिंधुदुर्गनगरी
सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) उद्रेक झाल्याचे आढळून येत आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला, मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हे करा:-
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
- अती जोखमीच्या रुग्णांची जसे ज्यांना फुफ्फुसाचे आजार, कर्करोग, हृदय रोग, इ. रुग्णांची तसेच पाच वर्षाखालील बालकांची विषेश काळजी घेणे.
हे करू नये :-
- हस्तांदोलन.
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
- सार्वजनिक ठिकाणी धुंकणे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही, याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तरी जनतेला मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाधीकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व आरोग्य विभाग सिंधुदुर्ग मार्फत आवाहन करण्यात येते की वरीलप्रमाणे फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करुन घ्यावी.