कणकवली पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी सुरू
९ ते १२ जानेवारी महोत्सवात विविध रंगारग कार्यक्रमांचे आयोजन
उद्या ९ जानेवारी रोजी कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कणकवली
कणकवली कणकवलीवासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील भव्य मैदानावर कणकवली पर्यटन महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री ९ वा. होणार आहे.
दरम्यान यावेळी इंडियन आयडॉल विजेता सलमान अली आणि वाद्यवृंद यांचा बहारदार ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच उद्घाटन होण्यापूर्वी शहरातून १७ प्रभाग आणि चार प्राथमिक शाळांचा सहभाग असलेले चित्ररथ निघणार आहेत. यासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. महोत्सवाला अगदी मोजकेच दोन दिवस बाकी राहिले आहेत. येथील स्टेज, डेकोरेशन, बॅनर हे सध्या लक्षवेधी ठरत असून यावर्षीचा “कणकवली पर्यटन महोत्सव” यादगार ठरणार आहे. संपूर्ण पटांगणावर डेकोरेशन, स्टेज, फूड फेस्टिव्हलसाठी लागणारे स्टॉल ची उभारणी केली जात असून, यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर साधारणपणे ७० स्टॉल उभारले जाणार आहेत. येथील नरडवे रस्त्यावर केलेली स्वागताची कमानी आणि डेकोरेशन देखील लक्ष वेधुन घेत आहे.
१० जानेवारी रोजी कणकवली शहर आणि परिसरातील तब्बल २५० कलावंतांचा सहभाग असलेला ‘कनकसंध्या’ हा कार्यक्रम रात्री ८ वा. रंगणार आहे.
११ जानेवारी रोजी इंडियन आयडॉल फेम रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे.
१२ जानेवारी रोजी कार्यक्रमाचा समारोप रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे, निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरूणिता तसेच चेतना भारद्वाज यांचा ऑकेस्ट्रा होणार आहे. शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील होणार आहे.