१८ वे विभागीय कवयित्री संमेलन २५ ला सावंतवाडीत रंगणार…
सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे ‘विभागीय कवयित्री संमेलन’ २५ जानेवारीला सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आरती’ मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली हे संमेलन होणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका हेमांगी नेरकर असणार. या संमेलनाचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनासाठी कोल्हापूरहून डॉ. ईला माटे, साखळी सत्तरी येथील प्रा. पौर्णिमा केरकर, पनवेल येथील ॲड. माधुरी थळकर, गोव्याहून राजनी रायकर, कविता आमोणकर या नामवंत कवयित्रींना या संमेलनासाठी आमंत्रित केलेले आहे. तसेच सिंधुदुर्गातील उत्तम कविता लिहिणाऱ्या नव्या व जुन्या नामांकित कवयित्रींचा देखील सहभाग असणार आहे. आरती मासिकच्या वतीने सिंधुदुर्ग, गोवा मर्यादित महिला काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनात होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे रसिकांच्या उत्तम उपस्थितीत व उत्स्फूर्त प्रतिसादात संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास आरतीच्या कार्यकारी संपादक व आयोजक प्रतिनिधी साहित्यिक उषा परब, संस्थेचे अध्यक्ष व संपादक डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, भरत गावडे, विठ्ठल कदम व कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी व्यक्त केला आहे.