मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा कार्यक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संस्कारधाम केळवाणी मंडळ संस्थापित जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाद्वारे आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात ४ जानेवारी २०२५ रोजी “लेखकांशी चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर सत्रासाठी दोन प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा आणि कवी गुरुदत्त वाकदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. विद्या हंचिनाळ (आयोजक) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी उपस्थितांना प्रोत्साहनपर शब्दांत संबोधित केले. प्रा. चैताली धनू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.
सॅबी परेरा आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी आजच्या पिढीला आवश्यक असलेले वाचन तसेच त्या वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच लोप पावत चाललेल्या वाचक वर्गाबाबत खंत व्यक्त केली. पुस्तके विद्यार्थ्यांवर कसे संस्कार घडवू शकतात याची जाणीव करून दिली. कार्यक्रमात गुरुदत्त वाकदेकर आणि रविंद्र पाटील यांनी स्वरचीत मराठी कवितांचे वाचन देखील केले आणि त्यांचे साहित्यिक अनुभव कथन केले.
सदर कार्यक्रमात प्रा. सायली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस वितरण समारंभाचाही समावेश होता. आंतरवर्गीय पुस्तक समीक्षा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा (विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी), बुकमार्क मेकिंग स्पर्धा यासह शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध ग्रंथालयीन कार्यक्रमांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जशभाई मगनभाई पटेल वाणिज्य महाविद्यालयाचे वाणिज्य, बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स, बीएससी आयटी तथा मराठी वाड्मय मंडळाचे विद्यार्थी; तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीदेखील उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात एका वाचन प्रेरणेने झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. साहित्य आणि वाचनाच्या सवयींना चालना देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे. उत्साहाने भारलेल्या ह्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. प्रणिता कामत यांनी केले. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.