*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणी आईच्या हो…*
आठवणी आईच्या हो सांगू तुम्हाला मी किती
तिच्या कार्यकर्तृत्वाला नाही मोज आणि मिती
होता जुना तो जमाना कष्टाला नव्हती सीमा
घामाची ती वाहे गंगा पुरे दिवस ना कामा…
जात्यावर घरघर गहू बाजरी जवारी
सणवार आलागेला, नीटनेटकी करारी
पाठवले शिकायला मी राहिले बाहेर
आठवायची हो आई झाले पारखे माहेर…
निटनेटके वळण तिच्या डोळ्याच्या धाकात
कसे बोलावे,वाढावे निगुतीने ते ताटात
होता मोठाच आधार मागे मागे फिरतसे
तिच्या वाचून हे माझे पान हलतच नसे…
दळतांना मांडी तिची माझा पाळणा नि उशी
किती दमत ती होती तरी दळे खुशी खुशी
शिकवणच नेटकी केली संकटे सामोरी
नाही गेलो हो शरण जरी उडली भंबेरी…
तिला पाहून पाहून माझ्यातच ती मुरली
जणू घडले अद्वैत नाही वेगळी उरली
आता दिसते सामोरी पण येत नाही बघा
आईपणाचा असतो असा चिवट तो धागा…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)