You are currently viewing पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद..

पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद..

पद्मश्री परशुराम गंगावणे; कुडाळ पोलीस कामकाजाच्या माहिती प्रदर्शनाला विद्यार्थी, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 

कुडाळ :

पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केले. रायझिंग डे च्या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कामकाज माहिती आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. गंगावणे बोलत होते. या प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट देऊन पोलिसांचे कार्य समजावून घेतले.

पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत याची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीनं रेझिंग डे सप्ताह जिल्ह्यात सुरु आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातल्या महत्वाच्या पोलीस ठाण्यात प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे आणि त्यातून विद्यार्थी, नागरिक यांना माहिती देण्याचा उपक्रम सध्या जिल्हयात सुरु आहे. आज कुडाळ पोलीस ठाण्यात दिवसभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृशिकेष रावले उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत पोलिसांचे विविध विभाग, त्यांचे चालणारे कार्य याची माहिती लोकांना देण्यात आली. या विभागांमध्ये पोलीस ठाणे कामकाज, सायबर पोलीस ठाणे, शस्त्र माहिती, फॉरेन्सिक विभाग, वाहतूक विभाग, बिनतारी संदेश विभाग, सागर सुरक्षा, भरोसा सेल, डायल ११२, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक अशा पोलिसांच्या विविध विभागांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. सगळ्याच स्टॉल्स वर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी या कार्यक्रम राबविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पोलिसांच्या कामकाजाविषयीची माहिती मिळते. पोलिसांचे विभाग कसे कार्यरत आहेत ते सामान्य लोकांना कळते. पोलिसांबद्दलची जी अनावश्यक भीती असते ते कमी होते असे सांगून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक कृशिकेष रावले यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यापूर्वी एकच दिवस या कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. पण यावेळी एक पूर्ण आठवडा हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात रावबिण्यात येत आहे. जेणेकरून जिल्हयातील सर्व लोकांना पोलिसांच्या कामकाजाची, ते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती मिळेल. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. रावले म्हणाले.

यावेळी पोलीस पाटील, बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कुलच्या शिक्षिका, विद्यार्थिनी, मुळदे हॉर्टिकल्चर कॉलेजची विद्यार्थिनी, पत्रकार प्रमोद ठाकूर यांनी आपले विचार मांडून या कार्यक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या.

कर्यक्रमाचे सूत्रसंचालन एपीआय सागर खंडागळे यांनी केले. यावेळी कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. खोपडे, पीएसआय रवींद्र शेडगे, एपीआय श्री. पालवे, श्री. कदम आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्वान पथकातील श्वान ब्राव्हो याने देखील सलामी दिली. श्वान पथकांच्या कामाविषयी अधिकाऱ्यांनी महिती दिली. यावेळी पोलीस बँड पथकाने विविध धून वाजवून उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा