पुणे :
साकव्य पुणे विभागीय मेळावा ५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केला होता. यासाठी वारजे हायवे जेष्ठ नागरिक संघाने आयोजनाची जबाबदारी घेतली आणि उत्तम रीतीने पार पाडली. त्यासाठी या संघाचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर बोधाई सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप मनापासून सर्वांनी आभार मानले. पंजाब नॅशनल बँक मेटलाईफ कंपनी प्रायोजक होती. कार्यक्रम दोन सत्रात पार पडला.
पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, प्रायोजक प्रतिनिधी यांची भाषणे आणि काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. पांडुरंग कुलकर्णी सर (अध्यक्ष, साकव्य मंच ) यांनी भूषविले. तर श्री. श्रीनिवास गडकरी ( सदस्य, साकव्य समुह) हे प्रमुख पाहुणे होते. सुरवातीला प्रतिमा पूजन आणि ग्रंथ पूजन करून सत्राची सुरुवात झाली. भाग्यश्री कुलकर्णीने साकव्य गीत सुरेल आवाजात सादर केले. हे गीत संस्थेचे सदस्य कै. अरविंद ढवळीकर यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर श्री. बोधाई सरांनी प्रास्ताविक केले. त्यांनी श्री. पांडुरंग कुलकर्णी, श्री. श्रीनिवास गडकरी आणि श्री. उदय दाईंगडे (क्लस्टर हेड पीएनबी मेटलाईफ) या तिघांचा सत्कार केला.
ज्योत्स्ना तानवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. गडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. गडकरी यांनी काव्य लेखनाची वैशिष्ट्ये, शुध्दलेखन, कविता सादरीकरण, वक्तृत्वकला, दुसऱ्या भाषा शिकण्याची गरज अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. श्री. उदय दाईंगडे सरांनी मेटलाईफ संबंधी माहिती दिली.
श्री पांडुरंग कुलकर्णी सरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी साकव्यच्या सर्व वेगवेगळ्या कामांची थोडक्यात सर्वांना माहिती दिली. मेळाव्याचे फायदे सांगून पूर्ण दिवसभराचे संमेलन घेण्याचा मनोदय जाहीर केला. त्यादृष्टीने सर्वांनी विचार विनिमय करण्याचे आवाहन केले.
ज्योत्स्ना तानवडे यांनी सर्वांना उत्सुकता असणारा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सुरवातीला या मेळाव्याच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धेचे परिक्षक श्री. हेमंत कुलकर्णी सर यांचे मनोगत वाचून दाखवले. त्यात त्यांनी कविता लेखनात झालेल्या चूका दाखवून देत उत्तम काव्यलेखना साठी खूप छान मार्गदर्शन केले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
*प्रथम क्रमांक – उमा व्यास*
*द्वितीय क्रमांक – राधिका भांडारकर*
*तृतीय क्रमांक – हेमांगी बोंडे*
*उत्तेजनार्थ – नंदकिशोर बोधाई*
*उत्तेजनार्थ – ज्योत्स्ना तानवडे*
सर्व यशस्वी कवीजनांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. त्यांनी काही कविता, किस्से सांगत रंजक पद्धतीने खूप सुंदर सूत्रसंचालन केले.
कवी संमेलनात प्रा. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस प्राप्त कवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जोडीला प्रा. शिंदेचे खुमासदार निवेदन होते.
यानंतर अल्पोपहार, चहा झाला. मंडळी ताजीतवानी होऊन दुसऱ्या सत्रातील काव्य संमेलन ऐकायला उत्सुक होती. या काव्य संमेलनाची सुरुवात अरूणाताई मुल्हेरकर यांनी कविता गायनाने केली. दोनच दिवसांपूर्वी त्या अमेरिकेहून या संमेलनासाठी आवर्जून पुण्याला आल्या हे विशेष. या काव्य संमेलनात २५ कवी- कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. वृत्तबद्ध कविता, गझल, भावगीत, हास्य कविता, बालगीत अशा एकापेक्षा एक बहारदार कविता सादर झाल्या. त्याला सर्व रसिकांनी भरभरून दाद दिली. जोडीला प्रा.अशोक शिंदेचे उत्स्फूर्त निवेदन, चारोळ्या, कविता यांनी रंगत आणली. सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना पीएनबी मेटलाईफ विषयी सविस्तर माहिती, आर्थिक गुंतवणूकीच्या काही योजनांची माहिती चित्रफीत दाखवून देण्यात आली. सर्वांनी त्यालाही छान प्रतिसाद दिला. शंका निरसन केले गेले.
शेवटी श्री. सुहास सांबरेंनी आभार मानले. कार्यक्रम आटोपशीर पण खूप छान रंगतदार झाला आणि खूप आवडला अशा प्रतिक्रिया बहुतेक सर्वांनीच दिल्या. याच्या नियोजनाची जबाबदारी नंदकिशोर बोधाई, सुहास सांबरे, चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्योत्स्ना तानवडे यांनी उत्तम रीतीने पार पाडली. या संमेलनासाठी अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी सर आवर्जून नाशिकहून आलेले होते. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आता पुढील मोठे संमेलन कसे, कुठे जेंव्हा कधी करायचे याचे बेत सुरू झाले असल्याचे ज्योत्स्ना तानवडे यांनी सांगितले.