बांदा :
बांदा शहरातील नामांकित व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरे झाले.यावेळी ख्यातनाम स्टेज डायरेक्टर श्री.भालचंद्र उसगावकर सर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर वाय.पी.एज्यूकेशन ट्रस्ट संचालित एस.एस.पी.एम.गोवा चे चेअरमन श्री.योगेश्वर पाडलोस्कर, सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये,डायरेक्टर ऑफ आर्ट ॲन्ड कल्चर गोवा चे श्री.रिद्धेश दाभोलकर,तसेच विशेष अतिथी म्हणून बांदा गावच्या प्रथम नागरिक श्रीमती प्रियांका नाईक,उपसरपंच श्री.राजाराम सावंत,जिल्हा पंचायत सदस्या सौ.श्वेता कोरगावकर तसेच गव्हर्निंग काऊन्सिल सदस्य श्री.शशी पित्रे,भिकाजी धुरी आवर्जून उपस्थित होते.त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.दौलतराव देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मानली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ.शिल्पा कोरगावकर, शाळेचा हेडबॉय कुमार गोविंद गावकर व हेडगर्ल कुमारी श्रीशा सावंत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वात प्रथम प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून स्कूल ॲंथेम म्हणण्यात आली व तदनंतर कार्यक्रमाची सोज्वळ सुरुवात नटेश्र्वराला आवाहन करून सुरेल अशा नांदी गायनाने झाली.ही नांदी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केली होती. प्रशलेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले. तदनंतर शाळेच्या शिक्षिका रसिका वाटवे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख व थोडक्यात परिचय करून दिला. श्री.योगेश्वर पाडलोसकर सरांनी आपले विचार स्पष्ट करताना या कार्यक्रमासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या व शिक्षकांचे विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कौतुकही केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.उसगावकर सर यांनी आपल्या भाषणात शाळेचा सलग १७ वर्षे १०० % निकाल लागणे काही साधी गोष्ट नसून, याबद्दल मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे व पालकांचे विशेष कौतुक केले. स्वतः नाटक क्षेत्राशी नाळ जोडलेली असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळा विविध उपक्रम राबवत असते व यापुढेही अभ्यासाबरोबरच असेच विविधांगी उपक्रम राबविले जावेत असे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही या शाळेत शिकत आहात याचा गर्व बाळगा आणि स्वतःचे आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उज्वल करा असा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली व सर्व हितचिंतक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण औपाचारिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कु.सेजल शेटये यांनी केले व शिक्षिका कु.स्नेहा गावडे यांनी आभार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सूत्रे शिक्षिका सौ.स्नेहा नाईक, सौ.कल्पना परब, सौ.दीक्षा नाईक व कु.स्नेहा गावडे यांनी केले.
गणेशवंदनाच्या नृत्य अविष्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ३० पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या गाथा शिवछत्रपतींची या ऐतिहासिक नाटकाला रसिकांची विषेश दाद मिळाली. इयत्ता चौथीच्या रिदितराव गावडे याचा अत्यंत लोकप्रिय असा कांतारा ॲक्ट कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थांच्या रंगतदार नृत्य अविष्कार, गीत गायन, नाटकांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. अशा रीतीने बांदा पंचक्रोशीतील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात संपन्न झाले.