*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*आचार संहिता….*
आचार संहिता लागू झाली, आचार संहिता लागणार आहे, असे असे निर्बंध आहेत…
अशा चर्चा निवडणुकीच्या वेळी सुरू होतात. म्हणजे निवडणूक कालावधी सोडला तर इतर
वेळी बेफाम वागायचे असते का? की तसे आपण वागतो म्हणून आचारसंहिता लागू होते?
मला मोठा प्रश्न पडतो. अहो, ही आचार संहिता
जन्मत:च आपल्याला लागू होते हो.. कशी?
आपल्या जगण्याचे काही विशिष्ट नियम आपण
आपल्या आईवडीलांकडे पाहून शिकतो ते काय
असते मग? उठल्यापासून एका विशिष्ट शिस्तीने
जरा ही न चुकता दररोज त्याच क्रमाने घरातली
मंडळी काम करतात ते काय असते मग? ती आचार संहितांच असते व मुले बघून बघून न सांगता ती शिकतात.पूर्वी शेतकऱ्याचा मुलगा
बापाला बघून बघून सारे न शिकवता शिकायचा
ते बापाच्या आचराणातूनच ना? मी आईच्या आचरणातून सारे शिकले. शिकवणी थोडीच
लावली होती? आचरणाची, किंबहुना उत्तम रूढ
आचरण म्हणजे जगण्याची संहिता. ही ज्याला
जमली तो क्वचितच अडचणीत सापडतो. मला
वाटते जीवनात आचारसंहिता असावीच.
सर्वात मोठे उत्तम उदा. आपल्या समोर निसर्गाचे
आहे. क्वचितच चुकतो तो, नि मग विध्वंस करून
जातो, होय ना? एरव्ही कसा शिस्तीत असतो पहा. दिवाळी शिवाय शेवंती फुलत नाही व सीताफळे ही येत नाही हो! आंबा खावा तो एप्रिल मे मध्येच. ही आचार संहिताच नाही का?
कोणत्या वेळी काय करावे याचे भान असणे म्हणजे आचार संहिता, हो की नाही?
सकाळी घरोघर स्नान होते, आपसुक मुलांनाही
सकाळीच स्नानाची सवय लागते. आजारी असलो तरी आपले स्नान टळत नाही. ही मुरलेली आचारसंहिता आहे.शाळेतील दिवस
भराचा कार्यक्रम काय आहे? आचारसंहिता आहे. या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की ती दैनंदिन आचारसंहिताच आहे हे
आपल्या लक्षातही येत नाही.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आचार संहिता हवीच. जी गोष्ट देशाला समुदायाला
लागू होते तीच समुहालाही लागू होतेच ना?
माझ्या अंगणात गोरज मुहुर्तवेळी नदी किनारी
उत्तरेला असणाऱ्या झाडांवरून हजारोंच्या संखेने
वटवाघळे एकाच दिशेने एका मागून एक शिस्तीने जातांना मी पाहते व आकाशातील पक्षी
उडतांना म्होरक्याच्या मागे शिस्तीतच उडतांना
दिसतात. ही आचारसंहिताच नाही तर काय आहे? सूर्य चंद्र तारे वारे, अहो, सारा निसर्गच
आचारसंहिता पाळतो मग आम्हाला का तिचे
वावडे असावे? माणूसच नाही तर प्रत्येक
प्राणी आचारसंहिता पाळतो.किंबहूना माणूस
कमी पाळतो म्हणू या. कुत्री मांजरी बघा. मांजर
विष्ठा झाकते. नाहीतर काय झाले असते हो?
कुत्री कमीच खातात. मिळते म्हणून जास्त खात
नाहीत. ऋतू वेळेवरच येतात. ती ती फुले फळे त्या त्या ऋतूतच येतात.ही आचार संहिताच आहे. मग जी शिस्त निसर्गात आहे ती आपल्यात
का नको? आणि पुढे जाऊन मी तर असे म्हणेन की, ही शिस्त लावण्याची नि ती ही माणसाला?
ज्याला देवाने अक्कल नावाची गोष्ट त्याने वापरावी म्हणून दिली आहे व प्रत्येकाला दिली
आहे,त्याला शिस्त लावण्याची गरजच का पडावी? मग काय आपण डोके गहाण ठेवून वागतो का? का वागतो? कुणी कुणाला शिस्त
लावावी यालाच माझा आक्षेप आहे. स्वयंशिस्त
नावाची काही गोष्ट आहे की नाही? का ती आम्ही बासनात गुंडाळून ठेवली आहे.
आता, आपल्या समुहात काही नियम, आचारसंहिता आहे ती तर पाळायलाच हवी.
जे नियम, नियमावली प्रशासन पाठवते ते नीट
वाचायलाच हवेत. असे केले तर प्रश्न उपस्थित
होणारंच नाहीत. माणूस आहे, कधी कधी चुकतो, तेवढे क्षम्य आहेच पण तुम्ही नियम न
वाचता तेच तेच प्रश्न प्रशासनाला विचारत राहिलात तर प्रशासकांना त्रास होतो. कारण त्यांच्यावर
घरादाराच्या, लेखनाच्या जबाबदाऱ्या आहेतच
ना? कुणी ही रिकामटेकडी मंडळी समुहात नाहीत. सारीच जबाबदार माणसे आहेत.मग उगीच प्रश्न वाढतील असे आपल्याकडून घडू
नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी.
विषय मोठा आहे पण आपला मेंदू त्याहून मोठा
आहे. वापरला तर सारेच प्रश्न तो सोडवतो. मग
आणखी काय हवे?
चला तर मग, सर्वच क्षेत्रात आचारसंहिता पाळून
आपले जीवन अधिक सुलभ बनवू या..
जयहिंद जयमहाराष्ट्र…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)