*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*द शो मस्ट गो ऑन*
*संधी*
मी सातव्या किंवा आठव्या इयत्तेत असेन, म्हणजे तेरा/चौदा वर्षांची. बुद्धी म्हणावी तशी परिपक्व नव्हती. एक ऑगस्ट, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त आंतर्शालेय वक्तृत्वाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या शाळेतून माझी आणि माझ्याहून एक वर्ष पुढच्या वर्गात असलेल्या मुलीची शाळेच्या प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. ती दुसरी मुलगी वक्तृत्वात फारच प्रवीण होती, ती सतत पारितोषिके मिळवत असे. तिच्यासमोर माझी काही डाळ शिजणार नाही, असा न्यूनगंड मला आला होता. तिच्यासमोर मी अगदीच फिकी पडेन असेच मला सारखे वाटत होते. घरी येऊन वडिलांना माझी ही बेचैनी मी सांगितली आणि म्हटलं की बाईंना मी माझं नाव काढायला सांगते. पप्पांना मात्र हे मुळीच रुचले नाही. त्यांनी मला खूप समजावले. म्हणाले, ” बाबी, हे बघ.
तुझ्याकडे चालून आलेली ही संधी आहे, ती अशी नाही दवडायची. घाबरायचे तर मुळीच नाही. तू कमी पडशील अशी शंका आहे ना तुला? मग जास्त मेहनत करायची, पण माघार घ्यायची नाही. आपण रोज तालीम करू. मी स्वतः करून घेईन तुझा सराव.” पप्पानी माझी जबरदस्त तयारी करून घेतली. शाळेला आम्ही दोघींनी ढाल मिळवून दिलीच, पण त्याचबरोबर सर्व शाळांतील सहभागी विद्यार्थिनीत मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तेव्हापासून लक्षात आले की मेहनत करायची आणि मिळालेल्या संधीचे सोने करायचे. बक्षीस मिळो वा न मिळो, स्पर्धेत मात्र अवश्य उतरायचे. त्या दिवसापासून *लाईफ इज ॲन अपॉर्च्युनिटी* हे विधान मी माझ्या जीवनपटावर अगदी एखाद्या शिल्पा प्रमाणे कोरून ठेवले आहे. मला कुठेतरी वाचल्यासारखे आठवते, *आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के* असतो.
खरे सांगायचे झाले तर माणसाचा जन्म मिळाला हीच तर फार मोठी संधी त्या नियंत्याने आपल्याला दिली आहे. हळूहळू मोठे होत असताना आपला विविध क्षेत्रात
वावर असतो, त्या ठिकाणी निरनिराळ्या वयोगटातील, जातीतील, धर्मातील, भिन्न भिन्न स्वभावाची, अनेकविध आवडीनिवडी असलेली बरी- वाईट माणसे आपल्याला भेटतात. त्यानुसार आपल्या जीवनाला एक प्रकारचा आकार मिळत जातो. यातील काही लोक आपले मित्र बनतात तर काहींशी हाय हॅलो करण्यापुरतेच आपण संबंध ठेवतो. काही तर आपल्याला आवडतच नाहीत. त्यांना टाळण्याचा आपण प्रयत्न करतो. अशी विविध माणसे आपल्या आयुष्यात येणे ही सुद्धा एक संधीच आहे असे मी मानते.
आता हेच पहा ना!संवाद मिडियाशि मी माझ्याच काही ओळखीच्या व्यक्तींमार्फत जोडले गेले. डीपी सरांच्या या पोर्टलवरव! लिहू लागले. दुसऱ्यांचे लेखन वाचून ज्ञानात भर पडू लागली. ही माझ्या आयुष्यात आलेली एक नामी संधीच नाही का? या ठिकाणी स्पर्धा होतात, उत्तेजन मिळते आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास वाढतो. मी जर या संधीचा फायदा करून घेतला नाही तर नुकसान कोणाचे? माझेच ना? एकूण काय कोणी कोणासाठी थांबत नाही, द शो मस्ट गो ऑन!
कोणतीही स्पर्धा म्हटली की “मला जिंकायचे आहे”, असे प्रत्येकाला वाटते, पण त्यातही काही माणसे अशी असतात ती स्वतः काही केले नाही दुसऱ्या, पुढे जाणाऱ्या माणसाचे
पाय खेचायचे, त्याचे मन खच्ची करायचे. त्यातच त्याला आनंद वाटतो. ही तमोगुणी वृत्ती आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, पण म्हणून तो अमका मला खाली पाडण्याचा प्रयत्न करील, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करील
अशी भीती मनात बाळगून घरी स्वस्थ बसायचे का? मुळीच नाही. संधी मिळत असेल तर मी प्रयत्न करणारच. मला विरोधकांची पर्वा नाही. सत्ताधारी पक्षाला सुद्धा विरोधकांचा विरोध झेलतच राज्याची धुरा सांभाळायची असते ना? तसे नाही केले तर अराजकच माजेल.
कुरुक्षेत्रावर भयभीत झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी काय उपदेश केला? तुझ्या आप्तांना, गुरुजनांना मारणारा तू कोण? तुझे सर्व कर्म तू मला अर्पण कर, कारण करता करविता मी आहे, तू फक्त एक साधन आहेस. हेच तत्व आपण सामान्यांनी आपल्या जीवनात अवलंबावे. पुढे जाणारा मी कोण? आणि मागे खेचणारा तो कोण? मी आणि तो या भगवंताची फक्त प्यादी. तोच संधी देतो आणि तोच आपली परीक्षा घेतो. हे जर ध्यानात ठेवले तर कोणी त्याला मिळालेली संधी घालवणार नाही. यावेळी नको नंतर बघू असे म्हटले तर संपलेच सगळे!
पुन्हा तीच सुवर्णसंधी कधी येईल की नाही याचा काहीच भरवसा नाही. *काळ चालला पुढे*
*पुढेच जायचे*
*जो थांबला*
*तो संपला.*
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन