*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भग्नता*
आजी नेहमी सांगायची
‘भग्न मूर्ती ठेवू नये हं
विसर्जन करून टाकावी’
आजीने सांगितलेलं सगळं बरोबर वाटण्याचा तो काळ
हळूहळू मागे पडला
मंदिराच्या पायथ्यापासून
कळसापर्यंत,
अखंड कोरलेल्या भव्य लेण्यांतील
मूर्तींपर्यंत
किती तोडफोड झाली गणतीच नाही
नाक,हात, पाय, डोकं , सोंड
जमेल ते सगळं उडवून टाकलं
पण तरी …
जपलीच ना आपण, ती भग्नता !
तसंही अभंग असं काय आहे ?
नाही धरू शकलो कधी
तिचा हात तर होतेच की
पडझड
आपल्या आतल्या कवितेची!
विखरून जातात इतस्ततः
मग तिचे तुकडे
महत्प्रयासानं गोळा करून जोडले
तरी कुठे मिळते …
पहिल्यासारखी
एकसंध कविता?
मग तीच अर्धी-मुर्धी कविता
वाचत राहतो आपण
वाचता वाचता जपत राहतो
तिच्यातली भग्नता
हळूहळू मनाची समजूत घालतो
की खरंच,
कविता कधी पूर्ण होते का ?
पुढे पुढे ती अपूर्णताच बोलायला लागते
स्वतःच्या आतल्या अपुरेपणातलं दुःख
सोसलेल्या कळा,
झालेली अवहेलना,
कुजलेली नाती,
न फुटलेले हुंदके,
इच्छांचे तुटके पंख,
अवघडलेल्या जाणिवांचा आकांत,
आणि काय काय…
काही गोष्टी भग्न झाल्या तरी
विसर्जन नाही करता येत…
उलट हातावरच्या फोडाप्रमाणं जपाव्या लागतात,
अर्ध्यामुर्ध्या भग्न कवितेसारख्या!
©®अंजली दीक्षित-पंडित
#अंजली_रविकिरण
#कवितेचामूड
#छंदमुक्तमी