जिल्हा बँकेची कर्जाची परतफेड न केल्याचे प्रकरण; कोल्हापूर सहकार न्यायालयाचे आदेश
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेतलेल्या 9 कोटी 60 लाख रुपये कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासहित प्रथमेश तेली, सर्वेश तेली व रुचिता तेली यांच्या मिळकती विक्री करण्यास, बक्षीस गहाण ठेवण्यास किंवा त्यावर बोजा ठेवण्यास कोल्हापूर येथील सहकार न्यायालय क्रमांक 2 यांनी प्रतिबंध केला आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेचे क्षेत्रीय वसुली व्यवस्थापक यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
श्री तेली यांनी जिल्हा बँकेकडे 2021 मध्ये 12 कोटीच्या कर्जाची मागणी केली होती. त्यांना 9 कोटी 60 लाख एवढे कर्ज बारा वर्षाच्या मुदतीसाठी पंधरा टक्के व्याजाने देण्यात आले. मात्र कर्ज घेतल्यापासून सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांनी रक्कम भरणा न केल्याने खाते एनपीए मध्ये गेले. तसेच ही रक्कम 12 कोटी 12 लाख एवढी झाली.
तसेच कर्जदार व जामीनदार यांना भेटून त्याबाबत कल्पना देऊनही त्यांनी रक्कम भरणा न केल्याने बँकेच्या वतीने कोल्हापुर येथील सहकार न्यायालयात दावा दाखल करून श्री तेली यांच्या वेंगुर्ले, कणकवली, कुडाळ तालुक्यातील तसेच पनवेल येथील मिळकती ज्या दाव्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत त्या त्यांना विक्री करण्यास, बक्षीस देण्यास, गहाण ठेवण्यास किंवा त्यावर बोजा ठेवण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीवर सहकार न्यायालयाने संबंधित मिळकती या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत हस्तांतरित करण्यास, बक्षीस अथवा गहाण ठेवण्यास किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा ठेवण्यास प्रतिबंध केला आहे.