खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण :
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून मालवण शहराची जलवाहिनी अर्थात मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे ४३ कोटी प्रशासकीय मान्यता रक्कमेतून नळपाणी योजनेचे विस्तारिकरण व नूतनीकरण होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.
पाणीपुरवठा योजना कामाचा भूमिपूजन शुभारंभ खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवार ६ जानेवारी रोजी मालवण येथे संपन्न होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जल शुद्धीकरण केंद्र कुंभारमाठ येथे होणार आहे. तर भरड मालवण येथील नगरपरिषद वाहनतळ येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे निमंत्रक मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे आहेत.
मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी योजना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 1999 साली साली विशेष बाब म्हणून मंजूर करून आणली. धामपूर तलावातून पाणी उपसा करून मालवण शहरापर्यत आणली गेलेली ही पाणीपुरवठा योजना अतिशय महत्वपूर्ण ठरली. शहरातील अनेक भागात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई, किनारपट्टी भागात असलेली क्षारयुक्त पाण्याची समस्या यावर पाणीपुरवठा योजना वरदान ठरली. खासदार नारायण राणे यांचे दूरदृष्टी नेतृत्व व निधी खेचून आणण्याची धमक अतिशय महत्वाची राहिली.
दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा नळकनेक्शन ग्राहक वाढत गेले. नागरिकांसाठी ही योजना जलवाहिनी बनली. योजनेवर भार वाढत गेले. योजनेवर दुरुस्ती करण्यात आली. कालांतराने आता जीर्ण झालेल्या या योजनेच्या नूतनीकरणसाठी मागील काही काळापासून निलेश राणे हे पाठपुरावा करतं होते. अखेर नवी योजना मंजूर झाली.
धामापूर पंपिंग स्टेशनं येथे जादा क्षमतेचा पंप, धामापूर पंपिंग स्टेशनं येथून कुंभारमाठ जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यत पाईपलाईन तिथून मालवण शहरात पाईपलाईन, शहरांत दोन ठिकाणी काही लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवणूक टाक्या. कुंभारमाठ येथून अन्य मंजूर गावात पाणी नेण्यासाठी साठवणूक व्यवस्था. अश्या नव्या व दर्जेदार कामांचा समावेश असून नागरिकांनी नियमितपणे शुद्ध पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. पावसाळी कालावधी वगळून दोन वर्षात मे. अभिषेक इन्फ्रा अँड डी. डी. कन्स्ट्रक्शन (जॉईंट व्हेन्चर) यां मक्तेदार कंपनीला काम पुर्ण करण्याची मुदत आहे. कॅन्सल्टन्सी फर्म पीसीएसकेके (जेव्ही) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे.
एकूणच मालवणसाठी अत्यंत महत्वाची असलेली ही पाणीपुरवठा योजना नूतनीकरण व विस्तारित होत असल्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. अतिशय महत्वाची योजना मार्गी लागत आहे. अशी माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.