पुणे :
रविवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अमृत महोत्सवांनिमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष एड. पुरुषोत्तम खेडेकर यांचा नागरिक सन्मान करण्यात येणार आहे. आज खेडेकरांनी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या परीने जागा केलेला आहे. मराठा सेवा संघाची स्थापना करून त्यांनी केवळ मराठा समाजाला जागे केले नाही तर तमाम बहुजन समाजाला जागे करण्याचे संघटित करण्याचे व त्यांना पुरोगामी विचारसरणी शिकविण्याचे व ती अमलात आणण्याचे महत्वपूर्ण काम केलेले आहे.
माझा एड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी पहिला परिचय अमरावती येथे झाला. अमरावती येथे नुकतीच मराठा सेवा संघाची स्थापना झाली होती. मराठा सेवा संघाचया एक कार्यक्रमाला श्री पुरुषोत्तम खेडेकर व त्यांचे सहकारी आले होते. हा कार्यक्रम अमरावतीचा इरवीन चौकातील सहकारी बँकेच्या सभागृहात झाला होता. पुढे खेडेकरांची बदली अमरावतीला सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून झाली आणि आमचे ऋणानुबंध घटट होत गेले. एक चांगला अधिकारी कसा असावा त्याचा पायंडा खेडेकरांनी आपल्या कार्यकाळात समाजासमोर ठेवला.. बहुतेक मोठ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयीन दारावर पाटी असते. विचारल्याशिवाय आत येवू नये .पण खेडेकर साहेबांच्या कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या दारावर जी पाटी होती त्या पाटीवर लिहिले असायचे ..आत येण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही.. आणि सर्वात महत्त्वाचे हे की त्यांच्या केबिनचा दरवाजा ते कार्यालयात असताना सतत उघडा असायचा. 99 टक्के अधिकाऱ्यांचे कार्यालयीन दरवाजे बंदच असतात .पण खेडेकर त्याला अपवाद होते. त्यामुळे सामान्य माणूस खेडेकरांना सहज भेटू शकत होता.
अमरावतीला साहेब कार्यकारी अभियंता असताना आम्ही सातत्याने खूप उपक्रम राबवले. खेडेकर साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून उपस्थित राहायचे. आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. त्यांचा बंगला हा मराठा सेवा संघाचाच नव्हे तर सर्व पुरोगामी विचारसरणीच्या लोकांचे एक चालते बोलते कार्यालय झाला होता.
खेडेकरांनी कार्यकारी अभियंता म्हणून चांगले काम तर केलेच .परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी केलेले लेखन. खरं म्हणजे कार्यकारी अभियंता हीच जबाबदारी फार मोठी असते. आणि आहेही. पण खेडेकर यांनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळून सातत्याने नियमितपणे लेखन केले आणि समाजाला जागे करण्यासाठी हे लेखन महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचवि ले. आज खेडेकर साहेबांच्या नावांवर जेवढी पुस्तके आहेत तेवढी महाराष्ट्राच्या इतिहासात सार्वजनिक बांधकाम विभागात किंवा अन्य विभागात काम करणाऱ्या कार्यकारी अभियंताच्या नावावर नाही आहेत. साहेबांचा शनिवार रविवार हा समाजासाठी असायचा. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी प्रचंड मोठे कार्यक्रम घेऊन मराठा समाजालाच नव्हे तर समस्त बहुजन समाजाला जागे करण्याचे बहुमोल काम केले आणि आजही ते करीत आहेत.
माझे संघटन कौशल्य त्यांना खूपच आवडायचे .ते सर्वांना सांगायचे जे काम कोणीच करू शकत नाही ते काठोळे सर 100% करू शकतात. आणि त्याची प्रचिती त्यांना माझ्या कामातून वेळोवेळी येत होती.
मराठा सेवा संघाने पहिले मराठा साहित्य संमेलन अमरावतीला घेण्याचे ठरवले. शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरातील संगीत सूर्य केशवराव भोसले येथे हे साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आ.ह .साळुंखे हे होते. ते संमेलनाच्या एक दिवस आधी अमरावतीला आले. विश्राम भवनावर मी खेडेकर साहेब व श्री साळुंखे सर यांची एक छोटेखानी सभा त्यांनी लिहून आणलेल्या भाषणावर चर्चा झाली.त्यांनी त्यांचे अध्यक्ष भाषण छापून आणलेलें नव्हते. खेडेकर यांनी मला बोलाविले आणि सांगितले काठोळे हे भाषण आजच्या आज मला छापून पाहिजे आहे. मी माननीय सहमती दर्शविली. साहेबांनी साळुंके सरांचे अध्यक्ष भाषण माझ्या हवाली केले. ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी मुद्रण कला आजच्यासारखी अध्याय यावर झाली नव्हती. पण माझ्याकडे तशी यंत्रणा होती आणि काही तासांमध्येच मी जे भाषण टंकलिखित करणे करेक्शन करणे छापणे व त्याच्या हजार कॉपीज तयार करणे हे अवघड काम केले. रात्री तीन वाजता काम संपले. माझ्याबरोबर प्रा. डॉ. आ . ह.साळुंखे हे देखील जागले. माझे छपाई क्षेत्रातले असामान्य व्यक्तिमत्व श्री संजय तराळ यांची डॉट कॉम नावाची कंपनी आहे. त्यांनी हे काम प्रमाणिकपणे निष्ठेने व वेळेवर केले. सकाळी छापलेल्या हजार प्रती मी खेडेकर साहेबांच्या हवाली केल्या. खेडेकर साहेबांनी माझे तोंड भरून कौतुक केले. खरं म्हणजे हे अवघडच काम होते. पण संजय तराळ नावाचा माझा निष्ठावंत मुद्रक व संगणक तज्ञ माझ्याबरोबर असल्यामुळे हे काम सहज शक्य झाले होते.
तीच गोष्ट जिजाऊ बँकेच्या स्थापनेची. मराठा सेवा संघाची बँक असली पाहिजे असा आग्रह श्री खेडेकर यांचा होता. श्री अविनाश कोठाळे यांनी पुढाकार घेतला. बँकेसाठी रितसर सहकार विभागाकडे अर्ज करण्यात आला. तेव्हा सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक श्री के . ई.हरिदास हे होते. त्यांच्याकडे अर्ज करण्यात आला. जिवलग मित्र होते. मी त्यांना बँकेला मान्यता देण्याची विनंती केली. काहीतरी अडचणी येत होत्या. खेडेकर साहेबांनी मला ठणकावून सांगितले. काठोळे हरिदास तुमच्या जवळचे मित्र आहेत ना. मग एक साधी बँक तुम्हाला देता येत नाही. त्यांचे हे शब्द मी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक श्री के ई हरिदास यांना सांगितले. त्यांना म्हटले साहेब काहीही करा पण जिजाऊ बँकेला मान्यता द्या. त्यांनी माझा व खेडेकरांचा शब्द मान्य केला व बँकेला मान्यता दिली .आज जिजाऊ बँक नुसता अमरावतीतच नाही तर विदर्भात ठिकाणी चांगले काम करीत आहे. खेडेकर साहेबांनी कदाचित ठणकावून मला सांगितले नसते आणि मी त्याच जिव्हाळ्याने जर हरिदास साहेबांना कामाला लावले नसते तर कदाचित जिजाऊ बँक उभी झाली नसती.
सत्यपाल महाराजांचे कार्यक्रम सर्वप्रथम खेडेकर साहेबांच्या कार्यकाळातच मराठा सेवा संघामध्ये सुरू झाले. आणि आज सत्यपाल महाराज मराठा सेवा संघाच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत. खेडेकर यांचा विरोध होता तो समाजातील अनिष्ट प्रथांना. प्रस्थापितांच्या अनिष्ट चालीरीतीना. बहुजन समाजाने चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या. त्या अमलात आणाव्या त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले व आजही ते करीत आहेत. खेडेकर साहेबांनी केवळ मराठा समाजाला जागे केले नाही तर तमाम बहुजन समाजाला त्याची अस्मिता जागे करण्याचे काम त्यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याप्रमाणे दलित समाजाला जागे केले व स्वतःची जाणीव करून दिली. त्याप्रमाणे पुरुषोत्तम खेडेकर यांनी काम केले असून त्यांनी शिवधर्म धर्माची स्थापना राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी म्हणजे सिंदखेड राजा येथे केली आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना करण्याच्या अगोदर सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मगावी येणाऱ्या जाणाऱ्यांची फारशी गर्दी जन्मोत्सवाला नसायची. खेडेकरांनी लक्ष घातले आणि आज सिंदखेडराजा 12 जानेवारीला भरगच्च भरलेला असतो .संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून निष्ठेने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लोक येतात. त्याचे श्रेय श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनाच द्यावे लागेल.
त्यांच्या पुढाकाराने आम्ही अमरावती येथे श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे मराठा सेवा संघाचे तीन दिवसाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतले. मी तेव्हा मराठा सेवा संघाचा सरचिटणीस होतो. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मी माझ्या सर्व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांसह सहा महिने तयारी करीत होतो. हे अधिवेशन इतके चांगले झाले की पुरुषोत्तम खेडेकरांनी माझी पाठ थोपटली. इतके चांगले अधिवेशन मराठा सेवां संघाच्या इतिहासात अमरावतीला सर्वप्रथम होत होते.
खेडेकर साहेब बोलायला स्पष्ट वक्ते आहेत . आत एक आणि बाहेर एक हा त्यांचा स्वभाव नाही .त्यामुळे त्यांच्या या स्पष्ट स्पष्ट वक्तेपणामुळे काही लोक दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण खेडेकर साहेबांचा स्वभाव खरं तेच बोलणार आणि जे बोलणार ते अमलात आणणार असा आहे. त्यांच्या पुढाकाराने आज मराठा समाजातील युवक व्यापारी लेखक प्राध्यापक आणि माणूस जागा झालेला आहे. त्यांनी मराठा सेवा संघाच्या वेगवेगळ्या उपशाखांकडून सर्वांना त्या अंतर्गत संघटित केले आहे. आज मराठा सेवा संघाच्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातही शाखा आहेत. त्यासाठी खेडेकरसाहेब केव्हाही प्रयत्न करत होते आहेत आणि राहतीलही .त्यासाठी त्यांनी घरादारावर पाणी सोडले आहे. सौ रेखा वहिनींची समर्थ साथ त्यांना मिळालेली आहे .सौ रेखा वहिनी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात .महाराष्ट्रातील विधानसभेचे नेतृत्व आमदार म्हणून त्यांनी केलेले आहे. त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे. पण त्याची काळजी न घेता त्या साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असतात .खरं म्हणजे साहेब आणि रेखा वहिनी म्हणजे एक आदर्श जोडपे आहे .अशा या आदर्श माणसाचा आज पुणे येथे बालगंधर्व जन्म रंगमंदिरात अमृत महोत्सवी सत्कार होत आहे. हे केवळ मराठा समाजालाच नव्हे तर तमाम बहुजन समाजाला अभिमानाची बाब आहे .आज या अमृत महोत्सवानिमित्त आपणास एक काम करावयाचे आहे .खेडेकर साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या पुरोगामी विचारसरणीसाठी वांहिलेले आहे .आपण त्यांची पुरोगामी विचारसरणी समजावून घेऊन ती अमलात आणण्याचा आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू या.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
माजी सरचिटणीस मराठा सेवा संघ
अमरावती कॅम्प
9890967003